Advertisement

अांतरविभागीय राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा ३० मार्चपासून


अांतरविभागीय राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा ३० मार्चपासून
SHARES

एक पाय नसलेल्या फलंदाजाला बॅटच्या आधारे उभे राहून चौकार ठोकताना पाहायचंय... एक हात नसूनही अचूक माऱ्यावर गोलंदाजी करणारे शूरवीर बघायचेत... धड उभंही राहता येत नसलं तरी मैदानात चेंडू अडविण्यासाठी धडपडणाऱ्या खेळाडूंच्या जिद्दीला सलाम ठोकायचाय... तर तुम्हाला ३० मार्चपासून मरीन लाईन्सच्या पोलीस जिमखान्यावर सुरू होत असलेल्या आठव्या आंतरविभागीय एलआयसी करंडक दिव्यांग क्रिकेट स्पर्धेला भेट द्यावीच लागेल. पाच विभागीय संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत मुंबईकरांना देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिव्यांग क्रिकेटपटूंसह भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचीही चौफेर फटकेबाजी अनुभवायला मिळणार आहे.


दिव्यांगांच्या क्रिकेटसाठी वाडेकरांचा पुढाकार

ज्या देशात क्रिकेटला धर्म मानलं जातं आणि खेळाडूंना देवाचा दर्जा दिला जातो, अशा आपल्या देशात दिव्यांगांचं क्रिकेट नेहमीच उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलं आहे. दिव्यांगांमध्ये क्रिकेटची कला ठासून भरली आहे. अाता त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी कसोटीपटू अजित वाडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. क्रिकेट खेळण्याचा अधिकार दिव्यांगानाही आहे आणि तो त्यांना आम्ही मिळवून देणारच, असं वाडेकर यांनी सांगितलं. गेल्या वर्षभरात पाच विभागांमध्ये झालेल्या स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱया खेळाडूंना घेऊन पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य विभाग असे पाच विभागीय संघ बनविण्यात अाले अाहेत.


काय अाहेत दिव्यांगांसाठी नियम?

या स्पर्धेत 40 टक्के दिव्यंगत्व असलेले खेळाडूच खेळू शकतात. या स्पर्धेचे बहुतांश नियम हे क्रिकेटसारखेच असले तरी एका डावात दोन धावपटू (रनर) घेण्याचा नियम आहे. अनेक खेळाडू एका पायाने दिव्यांग असल्यामुळे फलंदाजी करताना रनर घेण्याची त्यांना वारंवार गरज भासते.


कुठे होणार स्पर्धा?

तीन दिवस रंगणारी ही स्पर्धा पोलीस जिमखान्याच्या दर्जेदार मैदानासह नॅशनल क्रिकेट क्लब आणि कर्नाटक स्पोर्टिंगच्या मैदानावरही खेळविली जाणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा जीआयसी रे च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीमती एलिस वैद्यन, माजी कसोटीपटू करसन घावरी आणि उमेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार अाहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भारताच्या तब्बल 28 राज्यांमधून दिव्यांग क्रिकेटपटू मुंबईत येणार अाहेत. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारे दिनेश सैन, दशरथ जामखंडी, सौरभ रवालिया, प्रणव राजळे आणि बलविंदर सिंगसारखे खेळाडूही खेळताना दिसतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा