Advertisement

राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी


राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी
SHARES

भारताचा माजी कर्णधार आणि अंडर १९ क्रिकेट टीमचा मुख्य प्रशिक्षक ‘द वाॅल’ याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI)ने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA)चा प्रमुख म्हणून निवड केली आहे. टीम इंडियाच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. या निर्णयाची माहिती आयसीसी (ICC)ने ट्विट करून दिली आहे. 

बंगळुरुमध्ये असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा कायापालट करण्याच्या तयारीत बीसीसीआय आहे. तरुण खेळाडूंना क्रिकेटचे योग्य धडे मिळावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय असेल जबाबदारी?

या अकादमीत १९ वर्षांखालील युवा खेळाडूंना हेरणं त्यांना तसंच प्रशिक्षक, सहाय्यकांना मार्गदर्शन करणं, त्यांच्याकडून सराव करून घेणं ही भूमिका द्रविड पार पाडणार आहे. राष्ट्रीय महिला व पुरुष संघांसोबतही राहुल द्रविड काम करणार आहे. भारत अ, अंडर-१९ व अंडर-२३ वर्षांखालील संघांच्या जडणघडणीतही द्रविडचा हातभार असेल. याचसोबत राहुल द्रविडकडे बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या क्रिकेट अकादमींच्या प्रशिक्षकपदाची नेमणूकीचे अधिकारही देण्यात आले आहेत.


भारतीय संघातील दुखापतग्रस्त खेळाडू वैद्यकीय सल्ल्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत येतात. इथं प्रशिक्षित डॉक्टर आणि फिजीओथेरपिस्ट खेळाडूंच्या फिटनेसची चाचणी घेतात. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला यासंदर्भातील अहवाल सोपवण्याची जबाबदारीही द्रविडच्या खांद्यावर असणार आहे.

खेळाडूंची जडणघडण

राहुल द्रविड याआधी भारताच्या अंडर १९ वर्षाखाली क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत होता. परंतु द्रविडच्या नियुक्तीनंतर पारस म्हांब्रे आणि अभय शर्मा यांच्यावर १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारत अ आणि १९ वर्षाखालील क्रिकेट संघांच्या मोजक्या  दौऱ्यावर द्रविड देखील त्यांच्या सोबत असेल. 

भारतीय संघातील युवा खेळाडू पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, विजय शंकर यांची कारकीर्द घडवण्यात द्रविडचा मोठा वाटा आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखालीच पृथ्वी शॉच्या भारतीय क्रिकेट संघाने १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा