Advertisement

घरातही जडेजाची अष्टपैलू कामगिरी


घरातही जडेजाची अष्टपैलू कामगिरी
SHARES

बॉलिंग असो बॅटींग किंवा फिल्डींग या तिन्ही विभागांत अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आपली विशेष छाप सोडणाराभारतीय क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडू म्हणजे रवींद्र जडेजा. रवींद्र जडेजाने मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करून भारतीय संघातले स्थान पक्के करण्याबरोबरच लाखो भारतीयांची मनेही जिंकून घेतली आहेत. पण, चॅम्पियन्स ट्रॉफीतील एका चुकीमुळे सध्या चाहते सोशल मीडियावरून जडेजावर टीकेचा भडीमार करत आहेत.

ही चूक म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये अटीअटीच्या क्षणी फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिक पंड्याला रनआऊट करणे. जडेजाच्या जागी दुसरा एखादा खेळाडू असता तर त्याने आपली बाजू सावरायचा नक्कीच प्रयत्न केला असता. पण बिनधास्त जडेजाने ही चूक देखील तितक्याच खिलाडूवृत्तीने स्वीकारली.

'कॅस्ट्रॉल सुपर मॅकेनिक ट्रॉफी'च्या अनावरणाप्रसंगी जडेजा मुंबईत उपस्थित होता. या कार्यक्रमात त्याने संघात अष्टपैलू म्हणून जबाबदारी सांभाळण्यासोबत घरी पती आणि पिता म्हणून दुहेरी जबाबदारीही तितक्याच समर्थपणे सांभाळत असल्याचे सांगितले.



पती आणि पिता

मी नुकताच बाबा झालो आहे. त्यामुळे मला आता नव्या भूमिकेत शिरायचे आहे. मैदानावर मी जशी अष्टपैलू कामगिरी करून दाखवली, तशीच कामगिरी घरातही करून दाखवेन, असा मला विश्वास आहे.


निळ्या जर्सीत खेळण्याची इच्छा

भारतीय संघाच्या निळ्या जर्सीत खेळण्याची मला पहिल्यापासूनच इच्छा होती. त्यासाठी मी खडतर मेहनत केली. आलेल्या संकटावर मात केली आणि भारतीय संघात स्थान मिळवले. जागतिक रँकिंगमध्ये बेस्ट बॉलर म्हणून पहिल्या स्थानावर असणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.


फिटनेस महत्त्वाचा

खेळ कुठलाही असो त्यात फिटनेसचे महत्त्व फार मोठे आहे. तुम्ही व्यायाम करून स्वत:ला जितके फिट ठेवाल तेवढेच तुम्हाला जास्त क्रिकेट खेळता येईल. याची मला पुरेपुर माहिती असल्याने मी देखील धावणे, व्यायाम करणे अशा प्रकारे फिटनेसची खूप काळजी घेतो. फिट असल्यानेच फिल्डींग करताना मला चपळपणा दाखवता येतो.


टी-20, आयपीएल उपयुक्त प्लॅटफॉर्म

तरुणांसाठी टी-20 आणि आयपीएल हा खूपच चांगला प्लॅटफॉर्म आहे. मीदेखील अंडर-19 क्रिकेटमधून पुढे आलो आहे. आयपीएल स्पर्धेत 2008 मध्ये मध्ये राजस्थान रॉयल्सकडून पहिल्यांदा खेळताना निवड समितीला माझ्यात किती प्रतिभा आहे, ते दाखवू शकलो. आजच्या तरूणांनाही उत्तम संधी आहे.


टीकेला उत्तर

अापला देश जिंकावा, असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे देशासाठी खेळताना प्रत्येक खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावून खेळत असतो. शेवटी एखाद्या सामन्यात जो संघ चांगला खेळतो, पारडे त्याच्याच बाजूने झुकते. मी देखील प्रत्येक सामन्यात स्वत:ला झोकून देत खेळतो. ज्यांना क्रिकेट कळते, त्यांना बरोबर ठाऊक आहे की अशाप्रकारच्या रनआऊटच्या घटना आंतरराष्ट्रीय सामन्यात अनेकदा घडल्या आहेत. हा खेळातील एक भाग आहे. त्यामुळे कोण माझ्याबद्दल काय बोलते याच्याकडे लक्ष न देताच मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करणेच पसंत करतो.



हे देखील वाचा -

भारतीय फुटबॉल संघ कुणालाही घाबरत नाही - माटोस



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा