
भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते.
यशपाल शर्मा हे १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे भाग होते. त्यांनी या विश्वचषकातील वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ८९ धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. ते जेव्हा मैदानावर उतरले तेव्हा भारताची अवस्था ३ बाद ७६ अशी होती. त्यावेळी त्यांनी १२० चेंडूत ८९ धावा केल्या. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेगवान ४० धावा आणि इंग्लंडविरुद्ध अवघड परिस्थितीत ६१ धावा त्यांनी केल्या. या स्पर्धेत शर्मा यांनी ३४.२८च्या सरासरीने एकूण २४० धावा केल्या.
शर्मा यांनी १९७९ साली लॉर्ड्स मैदानातून इंग्लंडविरुद्ध आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि १९८३ साली ते कारकिर्दीतील अखेरची कसोटी खेळले. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाकडून ३७ कसोटी सामन्यांत ३३.४५च्या सरासरीने १ हजार ६०६ धावा केल्या. १४० ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती. तर एकदिवसीय ४२ सामन्यांत त्यांनी देशाचे प्रतिनिधित्त्व केले. यात त्यांनी २८.४८ च्या सरासरीने ८८३ धावा केल्या.
यशपाल यांच्या निधनानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी ज्या कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषकात मोलाची कामगिरी केली होती, त्या कपिल देव यांना देखील आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूची बातमी ऐकून गहिवरून आलं. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या प्रतिक्रियेदरम्यान कपिल देव यांना रडू कोसळलं.
