Advertisement

मुंबईकर पृथ्वी शॉची कमाल; पाकिस्तानच्या चिंधड्या उडवून भारताची विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक


मुंबईकर पृथ्वी शॉची कमाल; पाकिस्तानच्या चिंधड्या उडवून भारताची विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक
SHARES

मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताच्या १९ वर्षांखालील संघाने कमाल केली आहे. न्यूझीलंड इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानच्या चिंधड्या उडवून भारतीय संघानं चौथ्यांदा विश्वचषकाला गवसणी घालण्याच्या दिशेने कूच केली आहे. शुभम गिलचे नाबाद खणखणीत शतक (१०२) आणि पृथ्वी शॉ (४१), मनजोत कालरा (४७) यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीमुळे भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी २७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना बंगालचा मध्यमगती गोलंदाज इशान पोरेलने पाकिस्तानला एकापाठोपाठ हादरे दिले. या धक्क्यातून पाकिस्तानचा संघ सावरू शकला नाही. पाकिस्तानचा डाव अवघ्या ६९ धावांत संपुष्टात आणत भारतानं २०३ धावांनी विजय मिळवून थाटात अंतिम फेरी गाठली आहे. आता शनिवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे तीन वेळा विश्वविजेते एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.


पृथ्वी, मनजोतची दमदार सलामी, शुभमचे शतक

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनजोत कालरा या दोघांनी अपेक्षेप्रमाणे भारताला सुरेख सुरुवात करून दिली. पृथ्वीने ४१ तर मनजोतने ४७ धावांची खेळी करत पहिल्या विकेटसाठी ८९ धावा जोडल्या. पृथ्वीपाठोपाठ मनजोत बाद झाल्यानंतर शुभमने एकहाती किल्ला लढवत पाकिस्तानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. अवघ्या ९४ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने त्याने नाबाद १०२ धावांची खेळी साकारली. त्याला तळातील फलंदाज अनुकुल रॉयनेही (३३) चांगली साथ दिली. त्यामुळे भारताला ५० षटकांत ९ बाद २७२ धावा उभारता आल्या.


पाकिस्तानची शरणागती

भारताच्या २७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने इशान पोरेलसमोर सपेशल शरणागती पत्करली. इशानने पाकिस्तानच्या पहिल्या चार फलंदाजांना माघारी पाठवत त्यांच्या डावाला सुरूंग लावला. त्यानंतर शिवा सिंग आणि रियान पराग यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवत भारताची मोहिम फत्ते केली. पाकिस्तानचा अवघ्या ६९ धावांवर खुर्दा उडवत भारताने अंतिम फेरीत मजल मारली. पाकिस्तानचा हा सर्वात मानहानीकारक पराभव ठरला. सर्वोत्तम खेळी करणारा शुभम गिल सामनावीराचा मानकरी ठरला.


राहुल द्रविडवर स्तुतिसुमने

भारताच्या युवा क्रिकेटपटूंना हेरून त्यांच्यातील कौशल्य सर्वांसमोर आणण्यात मोलाचा वाटा उचलणारा माजी क्रिकेटपटू आणि १९ वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याच्यावर सोशल मीडियाद्वारे स्तुतिसुमने उधळली जात आहेत. भारतीय क्रिकेटच्या भवितव्यासाठी राहुल द्रविडने केलेली कामगिरी प्रशंसनीय आहे, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा