बंगळुरूविरूद्ध मुंबई इंडियन्सची बोहनी, ६ धावांनी मिळवला विजय

बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर बाजी मारली.

SHARE

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला होता. मात्र, बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर बाजी मारत पहिला विजय साकारला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने ६ धावांनी बाजी मारली.


१८८ धावांचं आव्हान

प्रथम फलंदाजी करत मुंबईनं बंगळुरुपुढं १८८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पार करताना तुफानी फलंदाज एबी डिव्हिलियर्स खेळपट्टीवर उभा असल्यानं बंगळुरुच हा सामना जिंकणार अशा चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगल्या होत्या. परंतु, मलिंगानं अखेरच्या षटकात भेदक मारा करत संघाला विजय मिळवून दिला.


मुंबईची चांगली सुरुवात

आयपीएलच्या बाराव्या हंगामात पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या मुंबई इंडियन्सनं डावाची सुरुवात चांगली केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी डावाची आक्रमक सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर सातव्या षटकात जोराचा फटका मारण्याच्या नादात क्विंटन बाद झाला. तसंच, रोहित शर्माचे अर्धशतक दोन धावांनी हुकलं. रोहितने ३३ चेंडूंत ८ चौकार आणि १ षटकाराच्या जोरावर ४८ धावा केल्या. दरम्यान, रोहित बाद झाल्यानंतर युवराज सिंगनं धडाकेबाज फटकेबाजी केली. युवराजनं युजवेंद्र चहलच्या १४ व्या षटकाच्या पहिल्या तिन्ही चेंडूंवर षटकार लगावले. मात्र, चौथ्या चेंडूवर बाद झाला. 


'एबी'ची तुफानी फलंदाजी

दरम्यान, या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची चांगली सुरुवात झाली नाही. मात्र, कर्णधार विराट कोहलीनं ४६ धावा करत संघाचा डाव सांभाळला. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सने तुफानी फटकेबाजी करत ४१ चेंडूंत नाबाद ७० धावांची खेळी सकारली. परंतु, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.


विराटच्या ५००० धावा

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली ४६ धावांवर बाद झाला. त्यामुळं विराटचं अर्धशतक ४ धावांनी हुकलं. परंतु, विराटनं या सामन्यात आयपीएलमधील ५००० धावा पूर्ण केल्या. यंदाचा आयपीएलचा हंगामात सुरुवातीला चेन्नई सुपर किंग संघातील सुरेश रैनानं पहिल्याच सामन्यात ५००० धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळं आयपीएलमध्ये ५ हजार धावा करणारा कोहली हा दुसरा फलंदाज ठरला आहे.हेही वाचा-

लसिथ मलिंगाचा अखेरचा चेंडू होता नो बॉल, सामन्यानंतर विराटनं सुनावलं पंचांना

मुंबई इंडियन्सची ओपनिंग पराभवाने, दिल्ली ३७ धावांनी विजयी
संबंधित विषय
ताज्या बातम्या