Advertisement

जाणून घेऊया रमाकांत आचरेकरांचा प्रवास..

भारतरत्न सचिन तेंडूलकरचे प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध झालेले आचरेकर सर आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. भारतीय क्रिकेटमधल्या एका पिढीला घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आयुष्याची अनेक वर्ष क्रिकेटच्या मैदानात घालवलेल्या आचरेकर सरांनी मुंबई क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं.

जाणून घेऊया रमाकांत आचरेकरांचा प्रवास..
SHARES

क्रिकेटचे भीष्माचार्य, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, क्रिकेटपटू विनोद कांबळी यांसह भारतीय क्रिकेट संघातील अनेक माजी खेळाडूंचे द्रोणाचार्य अशी ओळख असलेल्या रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी २ जानेवारी रोजी निधन झालं. वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी ह्दयविकाराच्या झटक्यानं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या कारकिर्दित भारतीय क्रिकेटमध्ये अनेक बदल घडवून आणणारे आणि भारतीय क्रिकेटमध्ये अनेक मौल्यवान खेळाडू निर्माण करणारे क्रिकेटगुरू ते क्रिकेटचे किंगमेकरपर्यंतचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया.


एकमेव प्रथम श्रेणी सामना

रमाकांत आचरेकर यांचा जन्म १९३२ साली मालवणमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील विठ्ठल आचरेकर यांच्या सहवासात रमाकांत आचरेकरांचं बालपण गेलं. मालवणमधील एका शाळेत शिक्षण घेत असतानाच त्यांना क्रिकेटचा ओढा लागला. वयाच्या १३ व्या वर्षी म्हणजे १९४३ साली त्यांनी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. त्यानंतर लगेचच दोन वर्षांनी १९४५ साली ते न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबसाठी क्लब क्रिकेट खेळले.

त्यानंतर यंग महाराष्ट्र इलेव्हन, गुलमोहर मिल्स आणि मुंबई पोर्टसाठी यांसह विविध क्लबसाठी क्रिकेट खेळले. १९६३-६४ मध्ये मोईन-ऊद-डावला या टुर्नामेंटमध्ये ऑल इंडिया स्टेट बँकेच्या विरूद्ध एकमेव प्रथम श्रेणी सामना त्यांनी आपल्या आयुष्यात  खेळला. त्यानंतर मात्र ते कधीही क्रिकेटच्या मैदानात उतरले नाहीत. त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली खेळाडू घडवण्यात रस दाखवला. 


महान खेळाडू घडवले 

 रमाकांत आचरेकर यांनी दादरच्या शिवाजी पार्क येथे कामाथ मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली. याच क्लबमध्ये त्यांनी तरूण पिढीला क्रिकेटचं प्रशिक्षण दिलं. आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली सचिन तेंडूलकर, क्रिकेटपटू विनोद कांबळी, प्रवीण आमरे, अजित आगरकर, रमेश पोवार, बलविंदरसिंह संधू यांनी प्रशिक्षण घेतलं. आचरेकरांनी अनेक नावाजलेले फलंदाज आणि गोलंदाज भारतीय संघाला दिले. सर्व क्रिकेटप्रेमींच्या मनात सचिन तेंडूलकरप्रमाणे रमाकांत आचरेकर सरांचही नाव कायम असतं. 


कडक शिस्त

भारतरत्न सचिन तेंडूलकरचे प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध झालेले आचरेकर सर आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. भारतीय क्रिकेटमधल्या एका पिढीला घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आयुष्याची अनेक वर्ष क्रिकेटच्या मैदानात घालवलेल्या आचरेकर सरांनी मुंबई क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. शिवाजी पार्कला सुरू केलेल्या क्लबचं काम सध्या त्यांची मुलगी कल्पना मुरकर आणि जावई दीपक मुरकर हे पाहत अाहेत. 


 द्रोणाचार्य पुरस्कार

अापल्या कारकिर्दित जागतिक दर्जाचे अनेक फलंदाज व गोलंदाजाची निर्मिती करणाऱ्या आचरेकर सरांना १९९० साली क्रिकेट प्रशिक्षणासाठी द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर २०१० साली त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं. त्याशिवाय २०१० साली त्यांना भारतीय संघाचे तत्कालीन प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात अाला. 


खेळाडूंच्या फॅक्टरीचे निर्माते

रमाकांत आचरेकर यांना खेळाडूंच्या फॅक्टरीचे निर्माते असं म्हटलं जातं. दादरच्या शिवाजी पार्कात जागतिक स्तरावरील क्रिकेटर व सचिन तेंडूलकरसारखा भारतरत्न घडवून जागतिक क्रिकेटचं लक्ष वेधून घेतलं होतं. सचिन तेंडुलकरसारख्या महान क्रिकेटपटूसह असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडविणारे गुरुवर्य रमाकांत आचरेकर हे ऋषितुल्य आहेत. केवळ क्रिकेटपटूच नव्हे तर माणसं घडवली, अशी आचरेकर सरांची विशेष ओळख होती.



हेही वाचा - 

क्रिकेटचे भीष्माचार्य रमाकांत आचरेकर यांचं मुंबईत निधन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा