Advertisement

मिताली राज बनली १० हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

याआधी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सनं १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र, १० हजार २७३ धावांनंतर एडवर्ड्स निवृत्त झाली. पण मिताली अजूनही खेळत आहे.

मिताली राज बनली १० हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू
SHARES

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ही पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. हा टप्पा पार करणारी मिताली ही जगभरात दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. 

याआधी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सनं १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र, १० हजार २७३ धावांनंतर एडवर्ड्स निवृत्त झाली. पण मिताली अजूनही खेळत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बहुमान देखील ती लवकरच मिळवण्याची शक्यता आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिका सुरू आहे. त्यात मितालीनं हा विक्रम केला आहे. १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी मितालीनं आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये ३१० सामने खेळले आहेत. त्यापैकी १० कसोटी सामने, २११ एकदिवसीय सामने तर ८२ टी २० सामन्यांचा समावेश आहे. मितालीने ८ शतके आणि ७५ अर्धशतके फटकावली आहे. 

१९९९ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. जवळपास २२ वर्षांहून अधिक काळ मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. क्रिकेटच्या इतिहासात मिताली सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेली महिला क्रिकेटपटू आहे. तसेच २०० हून अधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम देखील तिच्या नावावर आहे. सर्वाधिक सलग १११ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याचा देखील विक्रम तिच्या नावावर आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा