Advertisement

मुंबईची पंजाब मोहिम फत्ते, बाद फेरीच्या आशा अद्याप जिवंत


मुंबईची पंजाब मोहिम फत्ते, बाद फेरीच्या आशा अद्याप जिवंत
SHARES

प्ले-ऑफ फेरीत मजल मारण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकणे क्रमप्राप्त असताना मुंबई इंडियन्सनं आज वानखेडे स्टेडियमवर पंजाब मोहिम फत्ते केली. अतिशय थरारक रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं किंग्स इलेव्हन पंजाबचा अवघ्या ३ धावांनी पराभव करून आयपीएलमधील आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. आता बाद फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी मुंबईला शेवटच्या साखळी सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवरही विजय मिळवावा लागेल.

किरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने २० षटकांत ८ बाद १८६ धावा रचल्या होत्या. हे लक्ष्य पार करताना ख्रिस गेल नावाचे वादळ वानखेडे स्टेडियमवर घोंघावले नसले तरी लोकेश राहुलने मात्र आपला जलवा दाखवला. राहुल आणि आरोन फिंच यांनी मुंबई इंडियन्सच्या नाकात दम आणला. पण अखेरच्या क्षणी चार विकेट्स गमावल्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबला सामन्यावरही पाणी सोडावे लागले. या विजयासह मुंबई इंडियन्सने १२ गुणांसह चौथ्या स्थानी मजल मारली आहे.

सूर्यकुमारची चांगली सुरुवात

मुंबई इंडियन्ससाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा संघासाठी धावून आला. त्याचा सलामीचा साथीदार इर्विन लुइस (९) याला अँड्रयू टाय यानं त्रिफळाचीत करत मुंबईला पहिला धक्का दिला. मात्र सूर्यकुमारने इशान किशनच्या साथीने मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी जवळपास १०च्या सरासरीने धावा फटकावत मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. सूर्यकुमारने १५ चेंडूंत २७ तर इशानने १२ चेंडूंत २० धावांची खेळी केली.

मुंबईची मधली फळी गडगडली

इशानपाठोपाठ सूर्यकुमार यानेही पॅव्हेलियनचा रस्ता धरल्यानंतर कर्णधार रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र अवघ्या ६ धावा काढून रोहित शर्मा राजपूतची शिकार ठरल्यामुळे मुंबईचा संघ अडचणीत आला. त्यामुळे १ बाद ५९ अशा स्थितीतून मुंबईची अवस्था ४ बाद ७१ अशी झाली.


पोलार्ड-कृणालने सावरले

मुंबईचे दिग्गज फलंदाज माघारी परतले असताना किरॉन पोलार्ड यानं दिलेल्या संधीचं सोनं केलं. त्यानं कृणाल पंड्याच्या साथीने धुव्वाधार फलंदाजी करत मुंबई इंडियन्सला सामन्यात कमबॅक करून दिलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचली. पोलार्डने २३ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत ५० धावा फटकावल्या. कृणालनंही उपयुक्त योगदान देत ३२ धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला २० षटकांत ८ बाद १८६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

गेलचा अडसर दूर

मुंबईचे १८७ धावांचे उद्दिष्ट गाठताना ख्रिल गेल आणि लोकेश राहुल या दिग्गज फलंदाजांनी किंग्स इलेव्हन पंजाबला चांगली सुरुवात करून दिली. पण ३.५ षटकांत पंजाबला पहिला धक्का बसला. मिचेल मॅकक्लेनाघनने ख्रिस गेलला (१८) बेन कटिंगकरवी झेलबाद करत विजयाच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला.


लोकेश-फिंच पडले भारी

गेल बाद झाला तरी लोकेश राहुल आणि आरोन फिंच या आक्रमक फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: कत्तल केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचत पंजाबला विजयासमीप आणून ठेवले. या दोघांनी मुंबईच्या एकाही गोलंदाजाला यश मिळू दिले नाही. फिंचची खेळी जसप्रीत बुमराने ४८ धावांवर संपुष्टात आणत मुंबईला हवाहवासा ‘ब्रेक-थ्रू्’ मिळवून दिला.


तीन विकेट्ससह सामनाही गमावला

फिंचच्या रूपाने बुमराने मुंबईला यश मिळवून दिल्यानंतर त्याच १७व्या षटकांत बुमराने मार्क स्टॉयनिस यालाही (१) स्थिरावण्याची संधी दिली नाही. तीन षटकांत २३ धावांची आवश्यकता असताना बुमराने १९व्या षटकांत लोकेश राहुलचा अडसरही दूर करत मुंबईला विजयाच्या आशा पल्लवित केल्या. लोकेश राहुलचं शतक अवघ्या सहा धावांनी हुकलं. त्यानं ६० चेंडूंत १० चौकार आणि ३ षटकारांसह ९४ धावा तडकावल्या. अखेरच्या ३ चेंडूंत १५ धावांची आवश्यकता असताना अक्षर पटेलने षटकार ठोकत सामन्यात रंगत आणली. मात्र पंजाबला विजयासाठी ३ धावा कमी पडल्या.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा