Advertisement

मुंबई इंडियन्सचे ‘जितबो रे’, बाद फेरीच्या आशा जिवंत


मुंबई इंडियन्सचे ‘जितबो रे’, बाद फेरीच्या आशा जिवंत
SHARES

बाद फेरीत मजल मारण्यासाठी ‘करो या मरो’ अशा स्थितीत असलेल्या आणि वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सला १३ धावांनी धूळ चारून आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात खेळण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सूर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे मुंबई इंडियन्सने ४ बाद १८१ धावा उभारल्या. हे आव्हान पार करताना कोलकाता नाइट रायडर्सने रॉबिन उथप्पाच्या तुफानी खेळीमुळे विजयाच्या दिशेने कूच केली होती. अखेर कोलकाताच्या तळाच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करल्यामुळे मुंबईने १३ धावांनी विजय साकारला. आता मुंबई इंडियन्स ८ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.


सूर्यकुमार-लुइसची दमदार सलामी

एकापेक्षा एक सरस फलंदाज मुंबईकडे असताना मुंबईकर सूर्यकुमार यादवचा जलवा यंदाच्या आयपीएलमध्ये पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी तारणहार ठरलेल्या सूर्यकुमारने पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी करत मुंबईला दमदार सुरुवात करून दिली. सूर्यकुमारने इर्विन लुइसच्या साथीने कोलकाताच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत जवळपास १०च्या सरासरीने धावा फटकावत मुंबईला ९१ धावांची सलामी दिली. लुइसने ४३ धावांवर सूर्यकुमारची साथ सोडली. पण सूर्यकुमारने ३९ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५९ धावा फटकावत मुंबई इंडियन्सची भक्कम पायाभरणी केली.


हार्दिक पंड्याची तुफानी फटकेबाजी

सूर्यकुमारनंतर कर्णधार रोहित शर्माही (११) माघारी परतल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या धावसंख्येला वेसण घालण्यात कोलकाताचे फलंदाज यशस्वी ठरले होते. पण हार्दिक पंड्याने सर्व सूत्रे आपल्या हातात घेत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. त्याने कृणाल पंड्या (१४) आणि जेपी दुमिनी (नाबाद १३) यांच्या साथीने जोरदार आक्रमण करत २० चेंडूंत नाबाद ३५ धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला २० षटकांत ४ बाद १८१ धावा फटकावता आल्या.


कोलकाताची अडखळती सुरुवात

मुंबई इंडियन्सचे १८२ धावांचे आव्हान पार करताना कोलकाता नाइट रायडर्सची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. मिचेल मॅकक्लेनाघनने ख्रिस लिनला (११) बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर हार्दिक पंड्याने शुभमन गिलला (७) माघारी पाठवत कोलकाताला अडचणीत आणले.



रॉबिन-राणा चमकले

२८ धावांत २ विकेट्स माघारी परतल्यानंतर रॉबिन उथप्पा आणि नितेश राणा यांनी कोलकाताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी रचत कोलकाताला विजयाच्या दिशेने आगेकूच करून दिली.


मयांक मार्कंडेचा महत्त्वपूर्ण ‘ब्रेक-थ्रू’

कोलकाता संघ विजयाच्या दिशेने झेप घेत असतानाच मुंबईला विकेट्सची नितांत आवश्यकता होती. अखेर मयांक मार्कंडेने मुंबईला हवाहवासा ‘ब्रेक-थ्रू’ मिळवून दिला. मैदानावर स्थिरावलेल्या रॉबिन उथप्पाला (५४) बाद करत मयांक मार्कंडेने मुंबईला कमबॅक करून दिले. त्यानंतर नितीश राणा (३१), आंद्रे रस्सेल (९) आणि सुनील नरिन (५) एकापाठोपाठ पॅव्हेलियनमध्ये परतल्यामुळे मुंबईचा विजय सुकर झाला. कर्णधार दिनेश कार्तिकने नाबाद ३६ धावा फटकावत एक बाजू लावून धरली तरी कोलकाताला विजयासाठी १३ धावा कमी पडल्या.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा