Advertisement

IPL 2020 'मुंबई'चा विजय! पाचव्यांदा जिंकलं आयपीएलचं विजेतेपद


IPL 2020 'मुंबई'चा विजय! पाचव्यांदा जिंकलं आयपीएलचं विजेतेपद
SHARES

IPL 2020च्या १३ व्या हंगामातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाविरोधात ५ गडी राखून मुंबईन पाचव्यांदा विजेतेपद मिळवलं आहे. कोरोनामुळं यंदा आयपीएल दुबईत खेळविण्यात आली होती. मुंबई व दिल्ली यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत, मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवलं.

प्रथम फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीनं मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मानं केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं ५ गडी राखून सहज विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. स्टॉयनीस (०), अजिंक्य रहाणे (२) आणि शिखर धवन (१५) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी ९६ धावांची भक्कम भागीदारी केली. ऋषभ पंतनं ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यरने योग्य वेळी कर्णधारपदाला साजेशी खेळी केली.

श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावांची खेळी करत संघाला १५० पार मजल मारून दिली. ट्रेंट बोल्टने ३, कुल्टरनाईलने २ तर जयंत यादवने १ बळी टिपला. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईनं दमदार सुरूवात केली.

क्विंटन डी कॉक १२ चेंडूत २० धावा करून माघारी परतला, पण रोहित शर्मानं सुर्यकुमार यादव यांनी संघाचा डाव सावरला. रोहितसोबत चांगली भागीदारी असतानाच सूर्यकुमार यादव धावचीत झाला. रोहित हळूच फटका खेळत एकेरी धाव घेण्यासाठी धावला पण रोहित-सूर्यकुमार यांच्यात धाव घेण्यावरून गोंधळ झाला. अखेर रोहित नॉन-स्ट्राईकला पोहोचल्याचं पाहून सूर्यकुमारनं आपली क्रीज सोडली आणि स्वत:ला धावबाद करवून घेतलं.

सूर्यकुमार यादवनं २० चेंडूत १९ धावा केल्या. रोहितनं मात्र सूर्यकुमारच्या विकेटचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं नाही. त्यानं ५१ चेंडूत दमदार ६८ धावा केल्या. तो बाद झाल्यावर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

मुंबईचं हे पाचवं आयपीएलचं विजेतेपद ठरलं, तर रोहितसाठी एखाद्या संघाचे प्रतिनिधीत्व करताना हे सहावं आयपीएलचं विजेतेपद ठरलं. २००९ला डेक्कन चार्जर्सच्या आयपीएलच्या विजेत्या संघातही रोहितचा समावेश होता.

संबंधित विषय
Advertisement