Advertisement

दिलीप वेंगसरकर यांचे अारोप एन. श्रीनिवासन यांनी फेटाळले


दिलीप वेंगसरकर यांचे अारोप एन. श्रीनिवासन यांनी फेटाळले
SHARES

२००८ मध्ये विराट कोहलीला भारतीय संघात संधी दिली म्हणून मला राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदाची नोकरी गमवावी लागली, असा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात केला होता. मात्र या अारोपांचे बीसीसीअायचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी खंडन केले अाहे. वेंगसरकर यांनी केलेल्या अारोपांत कोणतेही तथ्य नसून हे अारोप बिनबुडाचे अाहेत, असं स्पष्टीकरण श्रीनिवासन यांनी दिलं अाहे.


वेंगसरकर काय म्हणाले?

दोन वर्षे मी भारतीय क्रिकेट निवड समितीचा अध्यक्ष होतो. ऑस्ट्रेलियात उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेत २३ वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद १२३ धावांची खेळी केली होती. विराटमध्ये निश्चितच काहीतरी आहे, याची खात्री मला पटली. म्हणून श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात त्याची निवड करण्याचे आम्ही ठरवले. विराटमधील गुणवत्ता पाहता येईल, हा त्यामागचा उद्देश होते. पण अाम्ही त्याला खेळताना पाहिलेले नाही, म्हणून त्याला संघात घेऊ नये, असं कर्स्टन अाणि धोनी यांनी मला सांगितलं. हा सर्व खटाटोप तामिळनाडूच्या बद्रिनाथला संघात घेण्यासाठी चालला अाहे, हे माझ्या लक्षात अाले होते. त्यावेळी बद्रिनाथ धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत होता अाणि एन. श्रीनिवासन हे तामिळनाडू बोर्डाचे अध्यक्ष अाणि बीसीसीअायचे खजिनदार अशा दोन जबाबदाऱ्या निभावत होते. मी विराटला संघात घेतल्यानंतर बद्रिनाथला बाहेर बसावं लागलं. श्रीनिवासन यांनी मला त्याबद्दल जाब विचारला. तेव्हा विराटला संघात घेणं कसं आवश्यक होतं, हे मी त्यांना समजावून सांगितलं. पण ते तडकाफडकी कृष्णम्माचारी श्रीकांतला घेऊन बीसीसीअायचे तत्कालिन अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गेले आणि मला निवड समितीतून बाहेरचा रस्ता दाखविला. त्यानंतर श्रीकांत हे निवड समिती अध्यक्ष झाले होते.


श्रीनिवासन यांचे प्रत्युत्तर

२००८ मध्ये दिलीप वेंगसरकर हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष होते, त्याचवेळी ते राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षही होते. अाॅगस्ट २००८ मध्ये बीसीसीअायचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीने निवड समितीत काही बदल करण्याचे ठरवले. त्याच बैठकीत निवड समिती सदस्यांना वार्षिक मानधन देण्याचे ठरवण्याचा निर्णय घेण्यात अाला. त्यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व निवड समित्या कायम ठेवण्यात अाल्या. मात्र वेंगसरकर यांनी त्यावेळी निवड समितीएेवजी एमसीएचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणे पसंत केले. मात्र अाता त्यांच्या गच्छंतीमागे माझा हात अाहे, असा अारोप वेंगसरकर करत अाहेत. त्यावेळी मी बीसीसीअायचा खजिनदार होतो. माझ्यामुळे अनेक लाभदायी योजनांचा लाभ वेंगसरकर यांना मिळाला अाहे. वेंगसरकर यांच्या म्हणण्यावरून माझ्या इंडिया सिमेंट्स लिमिटेड कंपनीने दादर युनियन क्लबच्या पायाभूत सोयीसुविधांसाठी मदत केली होती. मात्र तरीही वेंगसरकर यांनी माझ्यावर केलेले हे अारोप निराधार अाहेत, असं श्रीनिवासन यांनी म्हटलं अाहे.


हेही वाचा -

विराट कोहलीला संधी देऊन मी नोकरी गमावली - दिलीप वेंगसरकर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा