Advertisement

विराट कोहलीला संधी देऊन मी नोकरी गमावली - दिलीप वेंगसरकर


विराट कोहलीला संधी देऊन मी नोकरी गमावली - दिलीप वेंगसरकर
SHARES

राष्ट्रीय संघाच्या निवड समितीचं अध्यक्षपद ही सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती आणि त्यात कठोर निर्णय घेतल्याबद्दल मला नोकरी गमवावी लागली. श्रीलंका दौऱ्यासाठी मी विराट कोहलीला संधी दिली होती. पण कर्णधार महेंद्रसिंग धोनी अाणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या मनात वेगळीच खलबतं सुरू होती. एस. बद्रिनाथची संघात निवड करण्याची त्यांची इच्छा होती. पण मी विराट कोहलीचं नाव पुढे केलं अाणि निवड समितीचं अध्यक्षपद मला गमवावं लागलं, असा गौप्यस्फोट माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी केली. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं प्रथमच देण्यात अालेल्या क्रीडा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी कसोटीपटू व यष्टिरक्षक फारुख इंजीनिअर हेसुद्धा उपस्थित होते.


नेमकं काय घडलं?

दोन वर्षे मी भारतीय क्रिकेट निवड समितीचा अध्यक्ष होतो. ऑस्ट्रेलियात उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेत २३ वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद १२३ धावांची खेळी केली होती. विराटमध्ये निश्चितच काहीतरी आहे, याची खात्री मला पटली. म्हणून श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात त्याची निवड करण्याचे आम्ही ठरवले. विराटमधील गुणवत्ता पाहता येईल, हा त्यामागचा उद्देश होते. पण अाम्ही त्याला खेळताना पाहिलेले नाही, म्हणून त्याला संघात घेऊ नये, असं कर्स्टन अाणि धोनी यांनी मला सांगितलं. हा सर्व खटाटोप तामिळनाडूच्या बद्रिनाथला संघात घेण्यासाठी चालला अाहे, हे माझ्या लक्षात अाले होते. त्यावेळी बद्रिनाथ धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत होता अाणि एन. श्रीनिवासन हे तामिळनाडू बोर्डाचे अध्यक्ष अाणि बीसीसीअायचे खजिनदार अशा दोन जबाबदाऱ्या निभावत होते. मी विराटला संघात घेतल्यानंतर बद्रिनाथला बाहेर बसावं लागलं. श्रीनिवासन यांनी मला त्याबद्दल जाब विचारला. तेव्हा विराटला संघात घेणं कसं आवश्यक होतं, हे मी त्यांना समजावून सांगितलं. पण ते तडकाफडकी कृष्णम्माचारी श्रीकांतला घेऊन बीसीसीअायचे तत्कालिन अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गेले आणि मला निवड समितीतून बाहेरचा रस्ता दाखविला. त्यानंतर श्रीकांत हे निवड समिती अध्यक्ष झाले होते.


फारूख इंजिनिअर यांनी रंगवली किश्श्यांची मैफल

वेंगसरकर आणि फारुख इंजीनिअर यांनी क्रिकेटमधील अनेक किश्श्यांनी या सोहळ्यात रंगत अाणली. विशेष म्हणजे फारुख इंजीनिअर यांनी मराठीतून संवाद साधत सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. खवय्येगिरी, मुंबई क्रिकेटची अवस्था, विंडीज दौऱ्यातील वेगवान गोलंदाजीचा सामना, चंद्रशेखर यांची गोलंदाजी, टी-२० क्रिकेट अशा विविध विषयांवर या मान्यवरांनी आपली दिलखुलास मते व्यक्त केली. कसोटी हेच सर्वोत्तम क्रिकेट अाहे. मात्र सध्या अनेक खेळाडू कसोटीपेक्षा अायपीएलकडे अाकर्षित होत असल्याची खंत इंजिनिअर यांनी व्यक्त केली.


क्रीडा पत्रकारांचा गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्पया भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमात दिव्य मराठीचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी यांचा यावेळी महेश बोभाटे स्मृती क्रीडा पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात अाला तर युवा पत्रकार म्हणून पुढारीचे क्रीडा पत्रकार संदीप कदम यांचा आत्माराम मोरे स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा