Advertisement

भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची निवड


भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची निवड
SHARES

माजी कर्णधार राहुल द्रविडची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) बुधवारी केली. त्याच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ २ वर्षांसाठी म्हणजेच २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत असणार आहे.

द्रविड मागील काही वर्षे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख म्हणून कार्यरत होता. तसंच त्याने भारत ‘अ’ आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघांचे प्रशिक्षकपद भूषवताना उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या मार्गदर्शनात खेळलेले ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांसारखे युवा खेळाडू सध्याच्या भारतीय संघाचा भाग आहेत.

त्याने भारताचे प्रशिक्षकपद सांभाळावे अशी ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांची इच्छा होती. द्रविडची हे पद स्वीकारण्याची सुरुवातीला तयारी नव्हती. मात्र, गांगुली आणि शाह यांनी मागील महिन्यात इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामन्यादरम्यान द्रविडशी संवाद साधून त्याचे मन वळवले.

द्रविडने प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्यानंतर त्याची निवड निश्चित मानली जात होती. 'सुलक्षणा नाईक आणि आरपी सिंह यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने बुधवारी एकमताने राहुल द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून त्याच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरू होईल', असे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे.

सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर संपुष्टात येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा