Advertisement

'विराट'सेनेनं मुंबई इंडियन्सला दिली ५४ धावांनी मात

'विराट'सेनेतील जलद गोलंदाज हर्षल पटेलची हॅट्ट्रिक आणि फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबई इंडियन्सला ५४ धावांनी मात दिली आहे.

'विराट'सेनेनं मुंबई इंडियन्सला दिली ५४ धावांनी मात
SHARES

'विराट'सेनेतील जलद गोलंदाज हर्षल पटेलची हॅट्ट्रिक आणि फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबई इंडियन्सला ५४ धावांनी मात दिली आहे. मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे रोहितच्या पलटनला पराभवाला सामोरं जावं लागलं. नाणेफेक गमावलेल्या बंगळुरूनं प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६५ धावा केल्या. कर्णधार विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल यांची अर्धशतके आणि केएस भरतच्या महत्त्वपूर्ण धावांमुळं बंगळुरूला ही धावसंख्या गाठता आली. प्रत्युत्तरात मुंबईच्या स्टार फलंदाजांनी हाराकिरी पत्करली आणि त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला.

सामन्यात अष्टपैलू चमक दाखवणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या पराभवामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी फेकला गेला आहे. त्यामुळं त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची वाट खडतर झाली आहे. बंगळुरुच्या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी मुंबईसाठी ५७ धावांची सलामी दिली. फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने मुंबईला पहिला धक्का दिला. मोठा फटका खेळण्याच्या नादात क्विंटन डी कॉक झेलबाद झाला. त्यानं २४ धावा केल्या. 

फलंदाजीत कमाल केलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं गोलंदाजीत चमक दाखवत रोहितला बाद केले. त्यानं २८ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ४३ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार, ईशान, हार्दिक, कृणाल आणि पोलार्ड यांनी सपशेल निराशा केली. बंगळुरूचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने १७व्या षटकात हॅट्ट्रिक घेत मुंबईची विजचाची आशा संपुष्टात आणली. मुंबईचा संघ १८.१ षटकात १११ धावांवर सर्वबाद झाला. हर्षलनं १७ धावांत ४, चहलने ११ धावांत ३ तर मॅक्सवेलने २३ धावांत २ बळी घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात सलामीवीर देवदत्त पडिक्कलला शून्यावर बाद करत बंगळुरुला पहिला धक्का दिला. त्यानंतर विराट कोहली आणि केएस भरत यांनी कोणताही दबाव न घेता संघासाठी अर्धशतकी भागीदारी रचली. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये विराट कोहलीने आपल्या आक्रमक अंदाजात फटकेबाजी केली. दरम्यान त्याने टी-२० क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या. फिरकीपटू राहुल चहरला मोठा फटका खेळण्याच्या नादात केएस भरत झेलबाद झाला. सूर्यकुमारने त्याला झेल टिपला.

भरतने ३२ धावा जोडल्या आणि विराटसोबत ६८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट आणि मॅक्सवेलने संघाची कमान सांभाळली. १३व्या षटकात बंगळुरूने आपले शतक फलकावर लावले. विराटने १५व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर विराट बाद झाला. मिल्नने विराटला तंबूत धाडले. विराटने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. १८व्या षटकात मॅक्सवेलने जोरदार फटकेबाजी करत आयपीएलमधील आपले नववे अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात बुमराहने मॅक्सवेलला आणि एबी डिव्हिलियर्स यांना तंबूचा रस्ता दाखवला. मॅक्सवेलने ३७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात बंगळुरूला फक्त ३ धावा करता आल्या. बुमराहने ४ षटकात ३६ धावा देत ३ बळी घेतले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा