Advertisement

मुंबई इंडियन्सचे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’, पाचव्यांदा पराभवाची नामुष्की

मुंबई इंडियन्सची पराभवाची साडेसाती काही केल्या संपत नाहीये. सनरायझर्स हैदराबादला ११८ धावांवर रोखल्यानंतरही दहा फलंदाजांनी निराशा केल्यामुळे मुंबई इंडियन्सला या मोसमातील पाचव्यांदा पराभवाची नामुष्की पत्करावी लागली.

मुंबई इंडियन्सचे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’, पाचव्यांदा पराभवाची नामुष्की
SHARES

मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी विविध देवांच्या दर्शनाला जाऊन संघाच्या विजयाचं साकडं घालत असल्या तरी मुंबई इंडियन्सची पराभवाची साडेसाती काही केल्या संपत नाहीये. सनरायझर्स हैदराबादला ११८ धावांवर रोखल्यानंतर मुंबई इंडियन्स संघ वानखेडे स्टेडियमवर आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद करेल, असं वाटलं होतं. पण मुंबईकर सूर्यकुमार वगळता अन्य दहा फलंदाजांनी निराशा केल्यामुळे मुंबई इंडियन्सला या मोसमातील पाचव्यांदा पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. विशेष म्हणजे, ११९ धावांचे उद्दिष्ट गाठताना गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा डाव अवघ्या ८७ धावांवर संपुष्टात आला आणि सनरायझर्स हैदराबादने ३१ धावांनी विजय साकारला.


मुंबईची भेदक गोलंदाजी

घरच्या मैदानावर खेळताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच हैदराबादच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. ‘गब्बर’ शिखर धवन पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. मिचेल मॅकक्लेनाघन याने धवनचा (५) त्रिफळा उडवल्यानंतर त्याच षटकांत वृद्धिमन साहाला खाते खोलण्याचीही संधी दिली नाही. केन विल्यम्सन आणि मनीष पांडे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण पांडे (१६), शाकिब अल हसन (२) आणि केन विल्यम्सन (२९) एकापाठोपाठ माघारी परतल्यामुळे हैदराबादची अवस्था ५ बाद ६३ अशी झाली होती.


मयांक मार्कंडेची चमक

युसूफ पठाणने एक बाजू लावून धरली असताना मुंबईचा लेगस्पिनर मयांक मार्कंडेने दुसरी बाजू पोखरण्याचा प्रयत्न केला. मयांकने मोहम्मद नाबी (१४) आणि बसिल थम्पी (३) यांचे त्रिफळे उद्ध्वस्त करत मुंबई इंडियन्सला मजबूत स्थितीत आणलं. युसूफ पठाणने २९ धावांची खेळी केल्यामुळे सनरायझर्स हैदराबादला ११८ धावांपर्यंत मजल मारता आली.


मुंबईची निराशाजनक सुरुवात

सूर्यकुमार यादव आणि इविन लुइस यांनी डावाची सुरुवात केली खरी, पण मुंबई इंडियन्सचे सलामीचे तीन फलंदाज माघारी परतल्यामुळे घरच्या मैदानावरच मुंबईची अवस्था ३ बाद २१ अशी बिकट झाली होती. लुईस (५), इशान किशन (०) आणि रोहित शर्मा (२) हे दिग्गज फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. अखेर सूर्यकुमारने कृणाल पंड्याच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी करत मुंबई इंडियन्सच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या.


हार्दिक पंड्या सुपरफ्लॉप

कृणाल (२४), किरॉन पोलार्ड (९) आणि सूर्यकुमार (३४) यांच्या रूपाने तीन फलंदाज बाद झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या सर्व भिस्त हार्दिक पंड्यावर होती. अखेरच्या चार षटकांत ३९ धावांची आवश्यकता असताना हार्दिक पंड्याने राशिद खानचं षटक निर्धाव घालवलं. त्यानंतर १९ चेंडूंचा सामना करणाऱ्या हार्दिकला अवघ्या ३ धावा करता आल्या. हार्दिक सुपरफ्लॉप ठरल्याने मुंबईकर चाहत्यांची निराशा झाली. अखेर मुंबई इंडियन्सचा डाव ८७ धावांवर संपुष्टात आला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा