पुण्यातून सुमारे 100 कोटींचे एमडी जप्त

  Mumbai
  पुण्यातून सुमारे 100 कोटींचे एमडी जप्त
  मुंबई  -  

  मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान कक्षाने पुण्यातील एका फॅक्टरीवर कारवाई करत सुमारे १०० कोटी रुपयांचे 'मेफेड्रॉन' (एमडी) जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका तस्कराला मानखुर्द जकात नाक्याजवळ ८ किलो एमडीसह अटक केल्यानंतर पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.

  अंमली पदार्थांची तस्करी करणारी एक व्यक्ती करोडो रुपये किमतीचे 'एमडी' घेऊन मानखुर्द जकात नाक्याजवळ येणार असल्याची माहिती मिळताच अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या आझाद मैदान कक्षाच्या पथकानं या ठिकाणी सापळा रचला. सायन-पनवेल हायवेवर मानखुर्द जकात नाक्यापासून एक किलोमीटर अंतरावर एका मारूती कारमधून एक संशयित व्यक्ती पोहोचताच पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. पुण्यातील हडपसर परिसरात राहत असलेल्या हरिश्चंद्र नानासाहेब डोरजी (५२) हा तो ड्रग्ज तस्कर होता. त्याच्या झडतीमध्ये पोलिसांना तब्बल १ कोटी ६० लाख रुपये किमतीचे 8 किलो एमडी सापडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी डोरजी याला अटक करत एमडी आणि मारूती कार जप्त केली.

  ड्रग्ज तस्कर आरोपी डोरजी हा पुण्यातील हडपसर परिसरातील मगरपट्टा रोडवर असलेल्या अमेनोरा पार्क फ्युचर टॉवरमध्ये राहात असून, येथील एमआयडीसीतील एका फॅक्टरीमध्ये केमिकलच्या नावाखाली हे एमडी बनविले जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. याच माहितीवरून पोलिसांच्या एका विशेष पथकाने पुण्यातील कुरकुम एमआयडीसीतील एका फॅक्टरीमध्ये छापेमारी केली. त्यात हा ड्रग्जचा १०० कोटींचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.