मुंबईतील कांदिवली परिसरात भटक्या कुत्र्यांची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कांदिवली पश्चिम येथील मंगलमयी इमारतीजवळील नाल्यात 14 कुत्रे मृतावस्थेत आढळले. या कुत्र्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप श्वानप्रेमींनी केला आहे.
कांदिवली येथील रहिवासी हिना लांबाचिया यांनी याबाबतचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडील साईनगर मंगलमय इमारत परिसरात आणि सोसायटीमध्ये अनेक भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. सोसायटीमधील नागरिकांकडून या भटक्या कुत्र्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था देखील केली जाते. मात्र यातील अनेक भटके कुत्रे गायब झाल्यासंदर्भातील माहिती सोसायटीतील रहिवासी हिना लांबाचिया यांना समजली.
लांबाचिया यांनी या भटक्या कुत्र्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांना इमारती समोरील नाल्यात गोणीमध्ये काही कुत्र्यांचे मृतदेह दिसून आले. लांबाचिया यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला.
या घटनेसंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास केला असता या गोण्यांमध्ये 14 भटक्या कुत्र्यांचे मृतदेह सापडले.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्यातील तरतुदींनुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीची एक चित्रफीतही समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे. मृत कुत्र्यांचे मंगळवारी म्हणजे आज शवविच्छेदन करण्यात येणार आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हेही वाचा