गोवंडी रेल्वे स्थानकावर एकट्या प्रवाशाला लुटलं, दोघांना अटक

रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळेस एकट्या प्रवाशाला गाठून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून लुबाडल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे.

गोवंडी रेल्वे स्थानकावर एकट्या प्रवाशाला लुटलं, दोघांना अटक
SHARES

रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळेस एकट्या प्रवाशाला गाठून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून लुबाडणाऱ्या टोळीचा वाशी रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी अल्पवयीन आहे. शादात अजीज सय्यद (२५) आणि १६ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांच्या ४ साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. हे सर्व आरोपी गोवंडीच्या टाटा नगर परिसरात राहणारे आहेत.


कधी घडली घटना?

वाशी परिसरात राहणारे तक्रारदार नईम सलीम शेख हे काही कामानिमत्त १४ आॅगस्ट रोजी गोवंडीला आले होते. कामादरम्यान रात्री उशिर झाल्याने ते गोवंडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफाॅर्म क्रमांक १ वर थांबले होते. रात्रीची वेळ असल्यामुळे प्लॅटफाॅर्मवर कुणीही नव्हतं. त्यावेळी शादात आणि त्याच्या ५ साथीदारांनी अचानक येऊन नईम यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. एवढंच नाही, तर आरोपींनी त्यांच्याजवळून मोबाइल आणि पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. नईमने स्वत:ला सोडवण्यासाठी प्रयत्न केले असता शादातने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.


मृत्यू झाल्याचा संशय

या हल्ल्यात नईम गंभीररित्या जखमी झाल्यानंतर ते पोलिसांना आपली माहिती देतील, त्यातून आपण पकडले जाऊ या भीतीने आरोपींनी जखमी अवस्थेतील नईमला चाकूचा धाक दाखवून त्या भागातील गल्लीबोळातून फिरवलं. शरीरातून मोठ्या प्रमाणात झालेल्या रक्तस्त्रावामुळे नईम यांना भोवळ आल्यानंतर नईमचा मृत्यू झाल्याचा आरोपींना संशय आला. त्यानंतर सर्व आरोपी नईमला टाकून पळून गेले.


सीसीटीव्हीतून तपास

त्याच दरम्यान बेशुद्ध अवस्थेत असलेल्या नईमला एका स्थानिकाने पाहिल्यानंतर त्याने रक्तबंबाळ अवस्थेतील नईमला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे नईम एक दिवस बेशुद्ध अवस्थेत होते. गुरूवारी नईम शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासले.

सीसीटीव्हीतून धागेदोरे मिळाल्यानुसार पोलिसांनी सर्वात पहिल्यांदा शादाबला अटक केली. त्याच्या चौकशीनंतर गुन्हयात सहभागी असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला अटक केली. सध्या या प्रकरणातील ४ आरोपी फरार असून वाशी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.



हेही वाचा-

देवनार कत्तलखान्यातून बकरे चोरणाऱ्या तिघांना अटक

नशेसाठी त्यांनी पतपेढी लुटली



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा