SHARE

मुंबईतल्या एका खळबळजनक घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक दक्ष झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू परिसरात राहणारे 26 पाकिस्तानी नागरिक गेल्या साधारण तीन आठवड्यांपासून गायब आहेत. या 26 जणांना जंगजंग पछाडलं जात आहे. गायब झालेल्या पाकिस्तानी नागरिकांमधला एकजण गेली दहा वर्ष जुहू परिसरातला चहाविक्रेता आहे, अशी माहिती समोर आली आहे.

तूर्त गायब असलेले हे 26 जण पाकिस्तानच्या व्हिसावर भारतात दाखल झाले होते. पण त्यातल्या एकानेही भारतात वास्तव्यासाठी अनिवार्य असलेल्या ‘सी फॉर्म’सह इतर औपचारिकता पूर्ण केलेल्या नाहीत. भारतात वास्तव्य करू इच्छिणा-या पाकिस्तानी नागरिकानं ‘सी फॉर्म’मध्ये स्वतःच्या व्हिसासंबंधीच्या इत्थंभूत माहितीसह भारतात वास्तव्यादरम्यान तो किंवा ती भारतात नेमकं कुठे आणि किती दिवसांसाठी राहणार तसंच त्याच्या किंवा तिच्या भेटीसाठी कोण, कुठून येणार याबाबतचा संपूर्ण तपशील भरून देणं अभिप्रेत असतं. किंबहुना तो कायदेशीर प्रक्रियेचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पाकिस्तानी नागरिकानं ‘सी फॉर्म’ भरूनच न देणं आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेला याची माहिती नसणं निर्विवादपणे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोक्याची घंटा आहे.

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. पोलीस प्रशासन आणि एटीएसनेही यासंदर्भात मौन बाळगलं आहे. मात्र ‘मुंबई लाइव्ह’ला माहिती देताना एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने, आपल्याला या प्रकरणात तथ्य वाटत नसल्याचं सांगितलं आहे. मात्र, या प्रकरणाचं एकूण गांभीर्य लक्षात घेता एटीएस खोलवर तपास करत असल्याची ग्वाही दिली आहे.
मुंबईतून गायब झालेल्या 26 पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्यात कोणतीही हाराकिरी न करण्याचे आदेश एटीएसच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी रेकी करण्यासाठी हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी मुंबईत दाखल झाल्याची बातमी आली होती. या पार्श्वभूमीवर एटीएसने 26 गायब पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम सुरू करणं, महत्त्वाचं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या