नायर एमआरआय प्रकरण - रेडिओलॉजिस्ट संघटना डॉ. शहांच्या बाजूने


नायर एमआरआय प्रकरण - रेडिओलॉजिस्ट संघटना डॉ. शहांच्या बाजूने
SHARES

नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये खेचले गेल्याने राजेश मारु यांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर रेडिओलॉजिकल विभागाचे डॉ. सिद्धांत शहा यांना अटक केली. पण, या प्रकरणात फक्त एका व्यक्तीचा दोष नसून संपूर्ण संस्थेचा दोष आहे. त्यामुळे या प्रकरणाची नि:पक्षपणे चौकशी करण्यात यावी, अशी भूमिका इंडियन रेडिओलॉजिस्ट अॅण्ड इमेजिंग असोसिएशनने घेतली आहे. डॉ. शहा यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसताना त्यांना अटक झाल्याचा आरोप इंडियन रेडिओलॉजिकल अॅण्ड इमेजिंग असोसिएशनने केला आहे.


'४०२ कलम मागे घ्या'

डॉ. शहा यांच्यावर लावण्यात आलेले ४०२ हे कलम मागे घ्यावे, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. त्याचप्रमाणे, एमआरआय विभागातील कर्मचाऱ्यांचे कमी असणारे संख्याबळ, या विभागाकरिता सायंकाळी चार वाजल्यानंतर केवळ एक आया सेवेत असणे, या विभागाबाहेर २४ तास सुरक्षा रक्षक नसणे, निवासी डॉक्टरांवर येणारा कामाचा अतिरिक्त ताण या सर्व बाबी यंत्रणांनी पडताळून पाहिल्या पाहिजेत. तसेच, ज्या त्रुटी आहेत त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करावी, अशी मागणी असोसिएशनने या निवेदनात केली आहे.



नेमकं काय घडलं?

नायर रुग्णालयात २७ जानेवारीला राजेश मारु (३२) यांचा एमआरआय मशीनमध्ये खेचले गेल्याने मृत्यू झाला. ही मशीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक असल्यानं या व्यक्तीजवळ असलेल्या आॅक्सिजन सिलेंडरला मशीनने खेचून घेतलं. यादरम्यान, गॅस बाहेर पडून तो त्या व्यक्तीच्या पोटात शिरला. त्यानंतर रुग्णाचे पोट फुगू लागले आणि अक्षरश: त्याचे डोळे बाहेर आले. त्यानंतर त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. पण, तेथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. राजेश मारु हे त्यांच्या बहिणीच्या सासूला बघण्यासाठी म्हणून नायर रुग्णालयात गेले होते. त्यांचाही पुढच्या दोन दिवसांत मृत्यू झाला. त्यामुळे मारु आणि सोळंकी या दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.



हेही वाचा

पेशंटसोबत गेला आणि एमआरआय मशिनमध्ये अडकला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा