चेंबूर दंगलीप्रकरणी ३३ अटकेत, २०० जणांवर गुन्हा

अंत्ययात्रेला मुंबई तसेच मुंबईच्या बाहेरून पाच ते सहा हजारांचा जनसमुदाय या ठिकाणी जमा झाला. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या अंत्ययात्रेला पुढे हिंसक स्वरूप आले. जमावाने चेंबूर-कुर्ला रस्ता पूर्णपणे बंद केला. परिणामी पूर्व द्रुतगती महामार्ग, सायन-पनवेल

चेंबूर दंगलीप्रकरणी ३३ अटकेत, २०० जणांवर गुन्हा
SHARES

चेंबूर परिसरात बेपत्ता मुलीच्या पित्याने नैराश्येतून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यामुळे येथील वातावरण मंगळवारी चांगलंच चिघळलं. पोलिसांना मुलीचा शोध घेण्यास अपयश आल्याने चेंबूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. या जमावाला पांगवायला गेलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली होती. या प्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात २०० आंदोलकांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून आतापर्यंत ३३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.


 कुर्लाच्या ठक्कर बापा काॅलनीत पंचाराम रिठाडीया दोन मुले, मुलगी आणि पत्नीसोबत राहत होते. एकच मुलगी असल्यामुळे पंचाराम यांचा तिच्यावर जीव होता. लहानपणापासून इतर भावंडांपेक्षा ते तिचे लाड जास्त करायचे. काही महिन्यांपूर्वी त्यांची ही १७ वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. मुलीचा शोध घेऊनही तिचा काही थांगपत्ता लागत नसल्यामुळे पंचाराम यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मुलगी पळू गेल्यामुळे पंचाराम दुखी होते. समाजात मुलगी परपुरुषासोबत पळून गेल्याची कुजबुज चालू होती. पंचाराम यांना अनेकांकडून टोमणेही ऐकावे लागले होते. त्यामुळे नैराश्येत असलेल्या पंचाराम यांनी अखेर टोकाचं पाऊल उचललं. पंचाराम यांनी हार्बर मार्गावरील टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलखाली स्वतःला झोकून आत्महत्या केली.

या घटनेनंतर कुर्ला, चेंबूर परिसर आणि विशेषतः राजस्थानी रेगर समाज राहत असलेल्या ठक्कर बाप्पा कॉलनीत पोलिसांच्या विरोधात संतापाचं वातावरण होतं. आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा रेगर समाजाने घेतला होता. मात्र, घटनेला बरेच दिवस झाल्याने पोलिसांनी रेगर समाज आणि रिठाडिया कुटुंबीयांची समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मंगळवारी पंचाराम यांच्या अंत्ययात्रेवेळी परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती.  अंत्ययात्रेला मुंबई तसेच मुंबईच्या बाहेरून पाच ते सहा हजारांचा जनसमुदाय या ठिकाणी जमा झाला. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या अंत्ययात्रेला पुढे हिंसक स्वरूप आलं.

 जमावाने चेंबूर-कुर्ला रस्ता पूर्णपणे बंद केला. परिणामी पूर्व द्रुतगती महामार्ग, सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पोलिसांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. समजूत काढण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसांनाच जमावाने लक्ष्य केले. दगड, चपला, बॉक्स जे काही हातात मिळेल ते पोलिसांच्या दिशेने भिरकावण्यात येत होते. पोलिसांची तसंच खासगी वाहने आणि एसटी बसची तोडफोड देखील या जमावाने केली. वाटेत जे काही मिळेल त्याची नासधूस केली जात होती. ठक्कर बाप्पा कॉलनी ते चेंबूरच्या चरई स्मशानभूमीपर्यंत हा उद्रेक सुरू होता. अखेर पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी चेंबूर पोलिसात २०० जणांविरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी ३३ जणांची धरपकड केली.  तर इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.



हेही वाचा -

बेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने चेंबूरमध्ये दंगल परिस्थिती




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा