सुरक्षारक्षक हत्येप्रकरणी 6 जणांना अटक


सुरक्षारक्षक हत्येप्रकरणी 6 जणांना अटक
SHARES

गोरेगाव येथे विरा पंडियान या 34 वर्षांच्या सुरक्षारक्षकाच्या हत्येप्रकरणी 6 आरोपींना मुंबईतील विविध भागातून आरे पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली आहे. यात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. चेलिया दुराई हा मुख्य आरोपी असून, त्याच्यात व मृत विरा याच्यात काही दिवसांपासून फिल्म सिटीतील सेटच्या सुरक्षारक्षक कंत्राटावरून वाद सुरू होता. या वादातूनच चेलिया दुराई याने इतर पाच आरोपींच्या संगमताने विरा याची कट रचून हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. इतर पाच आरोपी हे चेलिया दुराईचे नातेवाईक आहेत. 

विरा हा मूळचा चेन्नईचा रहिवासी असून, तो आरे येथे राहत होता. गुरुवारी तो नेहमीप्रमाणे कामाला जात असताना तिघा आरोपींनी त्याला आरे डेअरीतील उपहारगृह येथे गाठून त्याच्याशी वाद घातला. प्रथम तिघा आरोपींनी विरा याच्या शरीरावर चाकूने वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. स्वतःला वाचवण्यासाठी विराने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघा आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला दगडाने मारहाण केली. या घटनेनंतर तिघे मारेकरी आणि बाहेर दुचाकीवर उभे असलेल्या तिघा आरोपींनी तेथून पळ काढला. हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाने पाहिला आणि त्याने आरे पोलिसांना माहिती दिली. या माहितीनंतर आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विराला गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. या हत्येनंतर पोलिसांचे सहा पथक तपासाला लागले. आरोपींची शोध मोहीम सुरू असताना सहाही आरोपींना पोलिसांनी विविध भागातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली. या गुन्ह्यात हैदरअली व एक अल्पवयीन आरोपी हे सावत्र भाऊ आहेत.

या घटनेनंतर आरे युनिट 7 येथे या घटनेचे पडसाद उमटले. आरेत युनिट 7 येथे शूटिंगचे सामान असलेल्या एका गोदामाला गुरुवारी रात्री आग लावण्यात आली. तसेच मृत विराच्या नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी सकाळी आरे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याचे सांगताच सर्व जमाव शांत झाला. चेलिया राजा, चेलिया दुराई, हैदर अली अब्दुल जमाल शेख, व्यंकटेश हरिजन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा