लोकलमध्ये आढळलं ७ दिवसांचं अर्भक

लोकलमध्ये आसनाखाली एका पिशवीत संशयास्पद वस्तू असल्याचा फोन एका व्यक्तीनं रेल्वे सुरक्षा बलाला केला. त्यावेळी रेल्वे सुरक्षा दलानं या पिशवीची तपासणी केली असता, यामध्ये ७ दिवसांचं लहानगे अर्भक आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लोकलमध्ये आढळलं ७ दिवसांचं अर्भक
SHARES

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना एखादी संशयास्पद वस्तू दिसल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असं वारंवार रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सांगितलं जातं. त्यानुसार, लोकलमध्ये आसनाखाली एका पिशवीत संशयास्पद वस्तू असल्याचा फोन एका व्यक्तीनं रेल्वे सुरक्षा बलाला केला. त्यावेळी रेल्वे सुरक्षा दलानं या पिशवीची तपासणी केली असता, यामध्ये ७ दिवसांचं  अर्भक आढळलं. रेल्वे पोलीस या बाळाच्या पालकांचा शोध घेत अाहेत. तसंच, त्यांच्याविरुद्ध कलम ३१७ नुसार लहान मुलाला उघड्यावर टाकून दिल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


संशयास्पद वस्तू

पश्चिम रेल्वेमार्गावरील भाईंदर स्थानकातून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक लोकल दादर स्थानकात आली. त्यावेळी भाईंदर लोकलच्या मोटरमन डब्यातील आसनाखाली प्लास्टिकच्या पिशवीमध्ये संशयास्पद वस्तू असल्याचा फोन रेल्वे सुरक्षा बलाच्या नियंत्रण कक्षाला करण्यात आला. नियंत्रण कक्षानं याबाबत दादर स्थानकाचे व्यवस्थापक आणि रेल्वे पोलिसांना माहिती दिली. या महितीनुसार, लोकल दादर स्थानकात येताच फ्लॅटफॉर्मवर गस्त घालत असलेल्या आरपीएफ जवानांनी डब्याची तपासणी केली. त्यावेळी आसनाखाली पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत कपड्यात गुंडाळलेलं नवजात अर्भक आढळलं.



बाळ सुखरूप

या बाळाला आरपीएफच्या जवानांनी तातडीनं शीव रुग्णालयात दाखल  केलं. रात्री उशिरा रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाची संपूर्ण तपासणी केली असता, हे बाळ अवघं ७ दिवसांचं असल्याचं समोर आलं. मात्र, वेळीच आलेल्या फोनमुळं आणि आरपीएफनं दाखवलेल्या सतर्कतेमुळं या नवजात बाळाचे प्राण वाचले आहेत. बाळ सुखरूप असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.



हेही वाचा -

मुंबईसह राज्यभरात ढगाळ वातावरण, राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता

टॅक्सीचं किमान भाडं ३० रुपये करण्याची टॅक्सीमेन्स युनियनची मागणी



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा