कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गोऱ्या साहेबाला अटक


कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गोऱ्या साहेबाला अटक
SHARES

मॉरेशिअसमध्ये कंपनी स्थापन करण्याच्या नावाखाली १३ कोटींचा गंडा घालणाऱ्या गोऱ्या साहेबाला म्हणजेच लंडनच्या ज्येष्ठ नागरिकाला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मार्क लॉरेन्स लोप्रेस्ट्रो (६२) असं या आरोपीचं नाव आहे. या फसवणुकीप्रकरणी आरोपी विरोधात लुक आऊट सर्क्यूलर (एलओसी) जारी करत त्याला एअरपोर्टवरून अटक करण्यात आली आहे.


काय आहे प्रकार?

तक्रारदार संतोष मस्करा (४७) यांची २००७ मध्ये मार्कच्या मार्फत विवेक टंडन नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. त्यांनी एकत्र येऊन मॉरिशिअसमध्ये अल्फापेट लि. ही कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कंपनीतील शेअर्सचे वाटेही ठरले. त्यासाठी मस्करा यांच्या पॉली जेन्टा टेक्‍नॉलॉजी कंपनीचे १० लाख २६ हजार ८६१ शेअर्स कोणताही परतावा न देता टंडने यांच्या नावे केले. तसेच टंडन, मार्क आणि इतर कर्मचाऱ्यांनी कंपनीत ५४ लाख २६ हजार रुपयांचा अपहार केला. त्यांच्या कंपनीकडून येणे अपेक्षीत असलेली १२ कोटी ४३ लाख रुपयांची रक्कमही मस्करा यांना मिळाली नाही. त्यानंतर २०१४ मध्ये मस्करा यांनी १३ कोटींच्या फसवणुकीची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली होती.


आणि मार्कला अटक

मूळचा लंडनचा नागरीक असलेल्या मार्ककडे अमेरिकेचंही पारपत्र आहे. हे दोन्ही पारपत्र आरोपीकडे सापडली आहेत. २०१४ मध्ये मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४०६, ४०८, ४६७, ४६८, ४२०, १२०(ब) आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. १३ कोटींच्या फसवणुकच्या या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत होती. तक्रारदाराची फसवणूक झालेल्या कंपनीत आरोपी मार्क हा त्यावेळी मुख्य वित्त अधिकारी म्हणून कार्यरत होता. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर मार्क विरोधात विमानतळावर एलओसी जारी केली होती. त्यानुसार शुक्रवारी मार्कला मुंबई विमातळावरून आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा