वडाळ्यात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


वडाळ्यात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
SHARES

टँकरच्या खाली आल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना वडाळा पूर्व येथील बीपीटी कन्टेनर रोडवर मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मित्र जखमी झाला आहे. दरम्यान घटनेच्या ठिकाणावरून फरार झालेला आरोपी टँकरचालक शेषमणी यादव (33) एचपी कंपनीतील असून त्याला अटक करण्यात अवघ्या 24 तासातच वडाळा पोलिसांना यश आले आहे.

विजय हिरालाल जयस्वाल (32) आणि लॉरेन्स डॉमनिक अँथोनी (22) हे दोघे ड्रेनेज लाईन साफ करण्याचे काम करतात. ते नेहमीप्रमाणे कामानिमित्त सकाळी 8.50 वाजता वडाळा पूर्व येथील बीपीटी कन्टेनर रोडवरून भायखळ्याच्या दिशेला दुचाकीवरून निघाले होते. परंतु सदरील मार्गावरील एचपी कंपनीच्या गेट क्रमांक 2 मधून बाहेर आलेला टँकर चुकीच्या पद्धतीने या मार्गावर चालू स्थितीत आडवा उभा होता. दुचाकीस्वार विजय हिरालाल जयस्वाल याला टँकरचा अंदाज न आल्याने त्याने समोरील टँकर पाहताच ब्रेक लावला आणि मागे बसलेल्या त्याच्या मित्राला वाचवण्यासाठी पाठीमागे ढकलले. अचानक ब्रेक दाबल्यामुळे दुचाकी स्लिप होऊन थेट टँकरखाली गेली आणि विजय टँकरच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याच्या पोटाला मार लागला. हे पाहून टँकरचालक शेषमणी यादव याने घटना स्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विजयला उपचारांसाठी जवळील बीपीटी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हा टँकर गेटमधून बाहेर काढताना अथवा गेटच्या आत घेऊन जातेवेळी येथे कंपनीचा सुरक्षारक्षक असणे गरजेचे होते. परंतु सिग्नल देण्यासाठी कोणीही उभे नसल्याने हा अपघात घडला. त्यामुळे वाहन चालकावर आणि कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी विजयच्या कुटुंबियांनी केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा