अनिल देशमुख यांची साडेआठ तास सीबीआयकडून चौकशी

अनिल देशमुख सकाळी १० वाजता सीबीआयच्या कार्यालयात पोहोचले होते. चौकशीसाठी सीबीआयने प्रश्नांची यादी तयार केली होती.

अनिल देशमुख यांची साडेआठ तास सीबीआयकडून चौकशी
SHARES

खंडणीचा आरोप झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची गुन्हे अन्वेषण विभागानं (सीबीआय) तब्बल साडेआठ तास कसून चौकशी केली. यावेळी सीबीआयने त्यांना अनेक उलटसुलट प्रश्न विचारल्याचं सांगितलं जात आहे. देशमुख यांनी यावर काहीही भाष्य न केल्याने देशमुख यांना नेमकं काय विचारलं गेलं? याबाबतचं गूढ वाढलं आहे.

सहायक पोलीस सचिन वाझे यांना १०० कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता. या प्रकरणी केंसीबीआयने अनिल देशमुख यांना समन्स पाठवलं आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची बुधवारी चौकशी करण्यात आली.

अनिल देशमुख  सकाळी १० वाजता सीबीआयच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी सीबीआयचे एसपी दर्जाचे अधिकारी अभिषेक दुलार आणि किरण एस यांच्याकडून त्यांची चौकशी करण्यात आली. सांताक्रुझच्या कालिना येथील डीआरडीओच्या कार्यालयात ही चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी सीबीआयने प्रश्नांची यादी तयार केली होती. 

त्यापूर्वी सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी केली होती. त्यांच्याकडून मिळालेली उत्तरे, सिंग यांचं पत्रं आणि कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांच्या आधारे सीबीआयने ही प्रश्नावली तयार केली होती.  सीबीआयने अत्यंत कसून ही चौकशी केली. मात्र, या चौकशीचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. 

सीबीआयला या प्रकरणाचा तपास करून १५ दिवसात कोर्टाला अहवाल सादर करायचा आहे. सीबीआय कोर्टाला अहवाल सादर करणार की कोर्टाकडून आणखी अवधी वाढवून मागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



हेही वाचा - 

सचिन वाझे आणखी दोघांची हत्या करणार होते, तपास यंत्रणांना संशय

पाण्याचा वापर जपून करा; मुंबईला ७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा