लष्करी अधिकाऱ्यांच्या नावाने ओएलएक्सवर फसवणूक करणारा अटकेत

प्रशांतकुमारने पाठवलेले पैसे हे राजस्थान येथील अलगड येथील बँकेत जमा झाले होते. हे पैसे टप्याटप्याने तेथील एटीएम मशीनमधून काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी मेलद्वारे बँकेतील सीसीटिव्ही फूटेज मागितले. मात्र बँकेकडून कोणते ही प्रतिउत्तर मिळाले नाही.

लष्करी अधिकाऱ्यांच्या नावाने ओएलएक्सवर फसवणूक करणारा अटकेत
SHARES

लष्करी अधिकाऱ्यांच्या नावाने ओएलएक्सवर गाडी विकण्याच्या नावाखाली साकीनाका येथील तरुणाची साडेतीन लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्यास पोलिसांनी राजस्थानहून बेड्या ठोकल्या आहेत. बसवाल लक्ष्मणगडअलवर असे या आरोपीचे नाव आहे. अशा प्रकारे त्याने अनेकांना गंडा घातला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 


काय आहे प्रकरण

आंध्रप्रदेश राज्यात राहणार प्रशांतकुमार हा सध्या अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका येथे राहण्यास आहे. जे. बी. नगर येथील एका खाजगी कंपनीत कन्सल्टंट म्हणून नोकरी करतो. प्रशांतकुमारला कामावरून घरी ये-जा करण्यासाठी जुन्यातील मोटारसायकलची गरज होती. त्यासाठी तो ओएलक्स या ऑनलाईन संकेतस्थळावर सेकंड हॅन्ड मार्केट वेबसाईटवर मोटारसायकल शोधत होता. १६ मार्च रोजी त्याने संकेतस्थळावर २६ हजार रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मोटारसायकलच्या मालकाला फोन केला. समोरील व्यक्तीने स्वतःचे नाव विकास कुमार पटेल असल्याचे सांगून तो नाशिक आर्टीलरी सेंटर येथे सैनिक असल्याचे सांगितले. त्याने प्रशांतला खात्री पटावी म्हणून स्वतःचे सैनिक असल्याचे ओळखपत्र आधारकार्ड, वाहन परवाना त्याच्या व्हाट्स अँपवर पाठविला.


गुन्हा दाखल

त्यानंतर दोघांमध्ये मोटारसायकलचा २६ हजार रुपयांमध्ये सौदा पक्का झाला होता. पटेलने आगाऊ रक्कम म्हणून १२ हजार रुपये ताबडतोब फोन पे या वॉलेटमध्ये टाकण्यासाठी प्रशांतला सांगितले. प्रशांतने १२ हजार ऑनलाइन ट्रान्सफर केले असता त्याने गाडी डिस्पॅच केल्याची स्लीप प्रशांतच्या व्हॉट्सअपवर पाठविली तसेच उर्वरित रक्कम लगेच पाठव असे सांगितले. प्रशांतने उर्वरित रक्कम देखील ऑनलाईन समोरच्या व्यक्तीच्या बँक खात्यात जमा केली. पटेल नावाच्या गाडी मालकाने एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक पाठवून हे तुमच्या गाडीची डिलिव्हरी हे करतील असे सांगण्यात आले.

दुसऱ्या दिवशी प्रशांतने त्या व्यक्तीला फोन केला असता, आर्मीच्या नियमानुसार मोटारसायकल बाहेर काढण्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट भरावे लागतील, हे पैसे पून्हा मिळण्याची हमी देत वेळोवेळी तब्बल साडे तीन लाख उकळले. मात्र समोरील व्यक्तींकडून पैशांची मागणी वाढतच असल्यामुळे प्रशांतकुमारला संशय आला. त्याने गाडी मालकाला फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा फोन बंद लागत असल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने साकिनाका पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. 


राजस्थानमधून अटक  

प्रशांतकुमारने पाठवलेले पैसे हे राजस्थान येथील अलगड येथील बँकेत जमा झाले होते. हे पैसे टप्याटप्याने तेथील एटीएम मशीनमधून काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी मेलद्वारे बँकेतील सीसीटिव्ही फूटेज मागितले. मात्र बँकेकडून कोणते ही प्रतिउत्तर मिळाले नाही. अखेर या गुन्ह्यातील आऱोपींची ओळख पटवण्यासाठी साकीनाका पोलिसांनाच राजस्थान गाठावे लागले. राजस्थानमधील ज्या खात्यातून पैसे काढण्यात आले ते खाते अलवरचे होते. तसेच एटीएमच्या मशीनमधील सीसीटिव्ही फूटेजमध्येही अलवरचा चेहरा आणि वेळ सारखी असल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.

पोलिसांना सापळा रचून त्याला बँकेत बोलवले. मात्र त्याला पोलिस मागावर असल्याची चाहूल लागताच त्याने घरातून पळ काढला. अखेर खबऱ्यांच्या माहितीने अलवरहा काही किलोमीटर अंतरवरील गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत त्याच्या मुस्क्या आवळल्या, त्याने सैनिकी ओळखपत्र कशी बनवली. कधीपासून तो अशा फसवणूक करत आहेत. आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली आहे. याचा माग आता पोलिस घेत आहेत. हेही वाचा -

महामार्गावर बंदुकीच्या धाकावर ट्रक लुटणारे आरोपी अटकेत  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा