सहाय्यक आयुक्ताला लाच घेताना अटक


सहाय्यक आयुक्ताला लाच घेताना अटक
SHARES

अंमलबजावणी संचलनालयाच्या म्हणजेच ईडीच्या प्रकरणांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी व्यावसायिकाकडून 15 कोटींची लाच मागणाऱ्या केंद्रीय महसूल विभागातील सहाय्यक आयुक्ताला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशोक नायक असे सहाय्यक आयुक्ताचे नाव असून, त्याच्यासह सीबीआयने धनंजय शेट्टी नावाच्या एका खासगी व्यक्तीला अटक केली आहे.

शहरातील एका व्यवसायिकावर अंमलबजावणी संचलनालयात गुन्हा दाखल असून, सध्या ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. काही दिवसांपूर्वी या व्यावसायिकाला ईडीच्या ऑफिसमधून भेटण्यासाठी फोन आला आणि ऑफिसमध्ये येण्यास सांगितले. ऑफिसला न आल्यास अटक केली जाईल असा धमकीवजा इशाराही फोन करणाऱ्याने या व्यावसायिकाला दिला. ईडीच्या कार्यालयात त्याची गाठ अशोक नायक नावाच्या सहाय्यक आयुक्ताशी पडली. ज्याने हे प्रकरण मिटवण्याच्या बदल्यात 15 कोटींची मागणी केली आणि दोन ते तीन दिवसांत 25 ते 30 टक्के रक्कम देण्यास सांगितली. अन्यथा तुम्हाला अटक केली जाईल असा इशारा देखील त्याने दिला.

धास्तावलेल्या व्यासायिकाने याची तक्रार थेट केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यावेळी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला आणि सव्वा कोटींची लाच घेताना अशोक नायक याला रंगेहात अटक केली. नायकला अटक झाली असता त्याने ही रक्कम एका खाजगी इसमाला द्यायची असल्याचं सांगितलं. त्यानंतर हे पैसे स्वीकारताना धनंजय शेट्टीला देखील सीबीआयने अटक केली. सोमवारी दोघांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 15 तारखेपर्यंत सीबीआयच्या ताब्यात दिले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा