५ बांगलादेशी नागरिकांना अटक


५ बांगलादेशी नागरिकांना अटक
SHARES

मुंबई महानगर प्रदेशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर सध्या पोलिसांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या दहशतवादी पथका(एटीएस)ने मंगळवारी नवी मुंबईतून ५ बांगदलादेशी नागरिकांना अटक केली. मागील ५ वर्षांपासून हे नागरिक भारतात आपली ओळख लपवून रहात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.


कुठे सापडले?

नवी मुंबईच्या पनवेल, सानपाडा, जुईगाव परिसरात मोठ्या प्रमाणात बांगालादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. हे बांगलादेशी नागरिक भारतीय नागरिक असल्याचं भासवून मागील ५ वर्षांपासून भारतात रहात होते. या पाचही आरोपींची माहिती मिळाल्यानंतर मुंबई एटीएसने १३ मार्च रोजी नवी मुंबईत विविध ठिकाणी कारवाई करत, ५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.


मजूर म्हणून काम

आरोपींमधील बहुतांश बांधकाम मजूर म्हणून काम करतात. या बांगलादेशी नागरिकांकडे कसल्याही प्रकारची कायदेशीर वास्तव्याची कागदपत्रे पोलिसांना आढळून आलेली नाहीत. त्यामुळे हे पाचही आरोपी विनापरवाना भारतात वास्तव्यास होते, असं स्पष्ट झालं आहे.


स्वतःचं आधारकार्ड

विशेष म्हणजे या पाचही आरोपींकडे स्वतःचं आधारकार्ड आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आरोपींनी हे आधारकार्ड कुणाच्या मदतीने आणि कसं बनवलं याचा एटीएस आता शोध घेत आहेत. या सर्व आरोपींना १७ मार्चपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.


याआधीही कारवाई

या पूर्वीही पोलिसांनी मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळून ६, वसई (पूर्व) येथील अग्रवाल इस्टेट मधून ४८ तसंच नवी मुंबई, तुर्भे येथील इंदिरा नगर झोपडपट्टीतून २८ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा