सिगारेट आणून न दिल्यामुळे तरुणावर जिवघेणा हल्ला


सिगारेट आणून न दिल्यामुळे तरुणावर जिवघेणा हल्ला
SHARES

मुंबईच्या चेंबूर परिसरात सिगारेट आणण्यास नकार दिल्याच्या रागातून चार सराईत आरोपींनी एका भाजी विक्रेत्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. कमलेश रामेश्वर जाधव (३३), अहमद हुसेन नबी हुसेन खान उर्फ गुड्डू (३५) अशी या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणातील दोन आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.


संपूर्ण प्रकार

चेंबूरच्या इंदिरानगर परिसरातील चेंबूर कॅम्प परिसरात शिवालाल गुप्ता हा १९ वर्षीय तरुण भाजी विक्रेता आहे. सोमवारी कमलेश रामेश्वर जाधव (३३), अहमद हुसेन खान, मनिष कोंडवळकर आणि अक्रम हे सराईत आरोपी दारू पिवून तिथे आले होते. सर्व नशेत असल्यानं त्यांनी गुप्ताला जवळील टपरीहून सिगारेट आणण्यास सांगितले. मात्र त्याचवेळी त्याच्याजवळ भाजी विक्रेत्यांनी खरेदीसाठी गर्दी केली. तेव्हा गुप्ताने जाण्यास नकार दिला. यावरून त्या चौघांनी गुप्ताला मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपाला गेला की, या चौघांनी स्वतःजवळील चाकूने गुप्ताला गंभीर वार केले. यात गुप्ता हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर या चौघांनी घटनास्थळाहून पळ काढला.


'त्या' दोघांना अटक

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देत, गुप्ताला तात्काळ जवळील शासकीय रुग्णालयात नेले. याप्रकरणी पोलिसांनी कमलेश आणि अहमद या दोघांना अटक केली असून त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत. या चारही आरोपींवर अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचं चेंबूर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा