सरकारी वकिलांच्या पैशांवर लिपिकाने 'असा' मारला डल्ला

सरकारी वकिलांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार न्यायालयाच्या आपील शाखा (रिट सेल) मध्ये कार्यरत असलेल्या समीर टोपले (४०) या लिपिकाला फसवणूकप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.

सरकारी वकिलांच्या पैशांवर लिपिकाने 'असा' मारला डल्ला
SHARES

अशिलांना न्याय मिळवून देणाऱ्या सरकारी वकिलांच्या मानधनावर लिपिकांनी डल्ला मारल्यामुळे या वकिलांनाच दाद मागण्यासाठी पोलिसांकडे धाव घ्यावी लागली आहे. या फसवणुकीप्रकरणी सरकारी वकिलांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार उच्च न्यायालयाच्या आपील शाखा (रिट सेल) मध्ये कार्यरत असलेल्या समीर टोपले (४०) या लिपिकाला आझाद मैदान पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.


'असं' मिळतं मानधन

वांद्र्यातील शासकीय वसाहतीत राहणारा आरोपी समीर टोपले फोर्टच्या सरकारी वकील कार्यालयातील अपील शाखेत (रिट सेल) लिपीक म्हणून कार्यरत आहे. या कार्यालयात एकूण ४ शाखा असून लेखा शाखेमध्ये समीरसह त्याचे अन्य सहकारी कार्यरत आहेत. या शाखेत कार्यालयीन कर्मचाऱ्यांचं वेतन, देयक, सरकारी वकिलांची व्यावसायिक फी, देयक तयार करण्याचं काम केलं जातं.

सरकारी वकिलांची व्यावसायिक कामातील विवरणपत्र (स्टेटमेंट) मंत्रालयातील विधी व न्याय विभागातून मंजूर होऊन आल्यानंतर संबधित अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढे मानधनाच्या जमापत्राचं कामकाज चालतं. या जमापत्राच्या दोन प्रति बनवून त्यावर बँक आणि अधिक्षकांची स्वाक्षरी झाल्यानंतर सरकारी वकिलांना मानधन दिलं जातं.  


'असा' झाला घोटाळा?

मागील काही दिवसांपासून अनेक सरकारी वकिलांचं मानधन वेळेवर होतं नव्हतं. या बाबतच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच होत्या. त्यातच उच्च न्यायालयातील एका वरिष्ठ सरकारी महिला वकिलाने न मिळालेल्या मानधनाची तक्रार अधिक्षकांकडे केली. अधिक्षकांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर संबधित महिला वकिलाच्या   बँक आॅफ इंडियाील खात्यावर ५६ हजार ९५९ एवढी रक्कम जमा केल्याची जमापत्राची नोंद तेथील कर्मचाऱ्यांनी दाखवली. कर्मचाऱ्यांची संशयास्पद वागणूक आणि असमाधानकारक उत्तरांमुळे महिला सरकारी वकील या जमापत्रांची नोंद घेऊन बँकेत चौकशीसाठी निघाल्या.


चौकशीत उघड

बँक मॅनेजर यांच्याजवळ महिला सरकारी वकिलांनी केलेल्या चौकशीत, बँकेत जमा केलेलं जमापत्र आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या जमापत्रात खातेक्रमांक बदलण्यात असल्याचं निदर्शनास आलं. तर ते पैसे कार्यालयीन लिपीक समीर टोपलेने स्वतःच्या खात्यावर वळवण्यात आल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार बँक मॅनेजर यांनी १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतचा समीरचे बँक स्टेटमेंट काढले असता. त्याने अशा प्रकारे अनेकांच्या खात्याचा क्रमांक बदलून २ ते अडिच लाख रुपये स्वतःच्या खात्यावर वळवल्याचे निदर्शनास आलं.


बँक खाती गोठवली

त्यानुसार फसवणूक झालेल्या महिला सरकारी वकिलाने ५ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी समीरवर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी न्यायालयीन कार्यालयातील वरिष्ठ लिपीक संजय धुमक आणि आरोपी समीर यांची बँक खाती गोठवली असून त्यांच्या खात्याचा तीन वर्षांचा तपशील बँकेकडून मागवला आहे.

या फसवणुकीत कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर १ जानेवारी २०१८ पासून समीर कामावरच आला नव्हता. या प्रकरणी किल्ला कोर्टाने समीरला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनवल्याची माहिती आझाद मैदान पोलिसांनी दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा