परदेशी नागरिकांना ठगवणाऱ्या गोवेकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या


परदेशी नागरिकांना ठगवणाऱ्या गोवेकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
SHARES

मुंबई पाहण्यासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना ठगवणाऱ्या गोव्यातील एका सराईत आरोपीला आझाद मैदान पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राॅबीन हुड्ड उर्फ ग्रीन व्हेल असं या आरोपीचं नाव आहे. त्याने आझाद मैदान परिसरात २ परदेशी नागरिकांना फसवल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.


उच्च शिक्षीत चोर

मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून परदेशी पर्यटक फिरण्यासाठी येतात. बहुतांश परदेशी नागरिक हे आझाद मैदान, कुलाबा, मरिन ड्राइव्ह फिरत असतात. त्यांच्यासाठी मुंबईही नवीनच असते. राॅबीन हा उच्चशिक्षीत असून तो इंग्रजी फारच चांगला बोलतो. शिवाय त्याचा पेहराव देखील परदेशी नागरिकांसारखाच असतो.

याच संधीचा फायदा घेऊन राॅबीन परदेशी नागरिकांना गाठायचा. आपण देखील परदेशातून आलो असून आपले पैसे संपले आहेत किंवा एकाने आपल्याला लुटलं असून परदेशातून पैसे मागवण्यासाठी मदत करा, असं म्हणत परदेशी नागरिकांना मदतीचं आवाहन करायचा.


पासपोर्टचा वापर

परदेशात पासपोर्टवरील नंबर शिवाय पैसे वळवले जात नाही. त्यामुळे राॅबीन परदेशी नागरिकांच्या पासपोर्टच्या मदतीने त्यांचे पैसे स्वतःच्या खात्यावर वळवायचा. घेतलेले पैसे काही तासांत परत करण्याचं आवाहन करून निर्जनस्थळी परदेशी नागरिकांना उभं करून तेथून फरार व्हायचा. अशा प्रकारे त्याने २०१६ मध्ये एका परदेशी नागरिकाला लाखो रूपयांना फसवलं होतं.


गोव्यातून अटक

तर ३० सप्टेंबर रोजी त्याने चीनहून आलेल्या एका वृद्ध परदेशी नागरिकाला सीएसटीएम इथं ६० हजार रुपयांना फसवलं होतं. त्या परदेशी नागरिकाने आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी पैसे जमा झालेल्या खात्याचा माग काढत राॅबीनला गोव्यातून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



हेही वाचा-

अक्षय कुमारचा माॅर्फ व्हिडिओ यू ट्युबवर; सायबर पोलिसांत तक्रार

दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपींना १२ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा