प्रेमभंग झालेल्या तरूणीला लाखो रुपयांचा गंडा, बंगाली बाबाला अटक

प्रियकर पुन्हा लग्नास तयार होण्यासाठी व त्याचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी त्याने मेरठ येथील दर्ग्यामध्ये काळी जादु करावी लागेल व देवासाठी घुबड, बकरी अशा प्राण्यांचा बळी द्यावा लागेल असं सांगितलं.

प्रेमभंग झालेल्या तरूणीला लाखो रुपयांचा गंडा, बंगाली बाबाला अटक
SHARES

प्रियकराला वश करण्याच्या नावाखाली प्रेमभंग झालेल्या युवतीला लाखो रूपयांना गंडा घालणाऱ्या बंगाली बाबाला नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या भोंदूने युवतीला तब्बल साडेचार लाख रुपयांना गंडा घातला. वासिम रइस खान ऊर्फ बाबा कबीर खान बंगाली ऊर्फ बाबा बंगाली असं अटक केलेल्या आरोपीचं नावं आहे. 

खारघर येथे राहणारी २६ वर्षीय युवती प्रियकराने लग्नास नकार दिल्याने डिप्रेशनमध्ये गेली होती. युवतीने लोकल ट्रेनमधून प्रवास करताना बंगाली बाबाची जाहिरात वाचली होती. प्रेमसंबंधातील अडचणींवर उपाय‘ पाहिजे असल्यास संपर्क साधा असा उल्लेख जाहिरातीत करण्यात आला होता. 

तरुणीनं मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता समोरील इसमाने तो "बाबा कबिर खान बंगाली" असल्याचे सांगितले. प्रियकर पुन्हा लग्नास तयार होण्यासाठी व त्याचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी त्याने मेरठ येथील दर्ग्यामध्ये काळी जादु करावी लागेल व देवासाठी घुबड, बकरी अशा प्राण्यांचा बळी द्यावा लागेल असं सांगितलं. यासाठी या बंगाली बाबाने युवतीकडून पुजा विधींसाठी वेळोवेळी  4 लाख 57 हजार रुपये घेतले. 

मात्र पैसे देऊन देखील काहीच फरक पडत नसल्याने युवतीने बाबा कबिर खान बंगालीकडे पैसे परत मागितले. मात्र, बाबा बंगालीने तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेल्यास काळी जादू करुन अपघात घडवून आणेल व तिला नष्ट करेन असं धमकावलं. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर  युवतीने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 

याप्रकरणी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी भोंदूबाबाच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीचे वेगवेगळे गुगुल पे क्रमांक, बँक अकाउंट क्रमांक आणि KYC याची माहिती घेतली. तसेच मोबाईल क्रमांक प्राप्त करुन सी.डी.आर. बनवण्यात आले. आरोपी गोविंदनगर, मिरा रोड, ठाणे येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने तिथे सापळा रचून आरोपी वसिम रईस खान उर्फ बाबा कबीर खान बंगाली ( 33) याला पोलिसांनी अटक केली. तो मुळचा राहणारा मेरठ, उत्तर प्रदेशमधील आहे. आरोपी बंगाली बाबाने अजून किती लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे याचा तपास केला जात आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा