बेस्टचा दणका, अँटॉप हिलमधून वीजचोरीचं रॅकेट उध्वस्त!

अँटॉप हिल परिसरात वीजचोरी करणाऱ्या ३६ जणांविरोधात बेस्टने कारवाई केली असून यातील १२ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सर्व आरोपींविरोधात वडाळा ट्रक टर्मिनस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेस्टचा दणका, अँटॉप हिलमधून वीजचोरीचं रॅकेट उध्वस्त!
SHARES

खेड्यापाड्यात अनेक ठिकाणी वीज नसल्यानं वीजेच्या तारांवर टाकलेले आकडे दिसले नाहीत तरच नवल. खेडयापाड्यात सर्रासपणे होणारी ही वीजचोरी मुंबईसारख्या मेट्रो सिटीतही होताना दिसते. पण फरक मात्र इतकाच, की मुंबईत वीजेच्या तारांवरील आकड्यांएेवजी अस्ताव्यस्त पसरलेलं केबलचं जाळं पाहायला मिळतं. अशाच प्रकारे वीजचोरी करत बेस्टला लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या वीजचोरांसह वीज माफियांना अखेर बेस्ट उपक्रमाच्या दक्षता वीजपुरवठा विभागाने दणका दिला आहे.



वीजचोरी प्रकरणी १२ जणांना अटक

अँटॉप हिल परिसरात वीजचोरी करणाऱ्या ३६ जणांविरोधात बेस्टने कारवाई केली असून यातील १२ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सर्व आरोपींविरोधात वडाळा ट्रक टर्मिनस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बेस्टचे उपमहाव्यवस्थापक आर. जे. सिंह यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


वीजमाफियांची टोळी सक्रिय

पाणी माफियांबरोबरच वीज माफियाही मुंबईत सक्रिय असल्याचं वेळोवेळी समोर आलं आहे. झोपडपट्ट्यांपासून मोठ्या उद्योगांमध्येही वीजचोरी होत असल्याचं चित्र असून बेस्टच्या कारवाईतून आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अँटॉप हिल येथील भारतीय कमला नगर परिसरात वीजचोरी होत असल्याची माहिती बेस्टच्या दक्षता वीजपुरवठा विभागाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी २३ जानेवारीला या परिसरात कारवाई केली असता वीजचोरीचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.



चेेंज ओव्हर स्विचने होते वीजचोरी

कमला नगर येथील तब्बल २५ गारमेन्ट कारखान्यांमध्ये तर अन्य काही ठाकणी चोरून वीज वापरली जात असल्याचं या कारवाईदरम्यान निदर्शनास आलं आहे. अधिकृत वीज मीटरमधून चेंज ओव्हर स्विचद्वारे चोरून वीज वापरली जात होती. अशी वीजचोरी करणाऱ्या ३६ जणांविरोधात दक्षता विभागाने कारवाई करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये एका वीज माफियाचाही समावेश आहे. या वीजमाफियासह ११ जणांना पोलिसांनी अटक केल्याचंही सिंह यांनी सांगितलं आहे.


लाखो युनिट्सची वीजचोरी

सिम्हा ९७-केबिन क्रमांक ६४७/०३७ या वीज मीटरमधून अनधिकृत जोडणी करत या वीजचोरांनी १,८८,३१५ युनिटची वीजचोरी केल्याचं उघड झालं आहे. वीजचोरी करण्यात आलेल्या युनिटची रक्कम तब्बल ४० लाख ७ हजार ८२४ रुपये इतकी आहे. त्यामुळे बेस्टला लाखो रुपयांचा चुना या वीजचोरांनी लावल्याचंही समोर आलं आहे. तर यावेळी ३ ते ४ किमीपर्यंतची १२०० मीटर वायर झोपड्यांच्या छतावरून काढून जप्त करण्यात आली आहे.



वीजचोरी कराल तर तीन वर्षे तुरूंगात जाल

वीजचोरी करणाऱ्यांविरोधात विद्युत कायदा २००३ अंतर्गत कलम १३५, १३८ आणि १५० नुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यानुसार वीजचोरांविरोधात आरोप सिद्ध झाल्यास त्यांना तीन वर्षांच्या तुरूंगावासाची शिक्षा सुनावली जाते वा दंडात्मक कारवाईही केली जाते. या दोन्ही शिक्षा एकत्रितही दिल्या जाऊ शकतात. असं असताना आता दक्षता विभागानं वीजचोरांविरोधात कंबर कसली असून यापुढे वीजचोरांविरोधातील कारवाई अशीच सुरू राहील आणि त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती सिंह यांनी दिली आहे. त्यामुळे वीजचोरी कराल तर थेट तुरूंगात जाल, हेच आता सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा