भीमा कोरेगाव हिंसाचार: आंदोलनकर्त्यांवर १२० गुन्हे दाखल, तर २५० जण ताब्यात


भीमा कोरेगाव हिंसाचार: आंदोलनकर्त्यांवर १२० गुन्हे दाखल, तर २५० जण ताब्यात
SHARES

भीमा कोरेगाव हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी 'महाराष्ट्र बंद'च्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरलेल्या शेकडो आंदोलकांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात तोडफोड करत सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं. तर काहींनी पोलिसांवर देखील हल्ला केला. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली. पोलिसांनी आतापर्यंत राज्यभरातील विविध पोलिस ठाण्यांत आंदोलनकर्त्यांवर १२० गुन्हे नोंदवले असून त्यापैकी २५ गुन्हे मुंबईत नोंदवण्यात आले आहेत. यापैकी ३७ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकणच्या २५० कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून फरार आंदोलकांवर गुन्हा नोंदवणार असल्याचं मुंबई पोलिस प्रवक्ते सचिन पाटील यांनी सांगितलं.


९० पोलिस जखमी

आंदोलनकर्त्यांनी चेंबूर, पवई, गोवंडी इ. ठिकाणी वाहनांची तोडफोड करत गस्तीवर असलेल्या पोलिसांवर देखील दगडफेक केली. गोंवडीच्या आनंदनगर, निलम जंक्शन, अशोक नगर, सावली नाका या ठिकाणी करण्यात आलेल्या दगडफेकीत गोवंडी पोलिस ठाण्याचे १५ अधिकारी गंभीर जखमी झाले असून राज्यभरातील जखमी पोलिसांचा आकडा ९० वर गेला आहे. 



९० बसची तोडफोड

त्याच बरोबर प्रतिक्षानगर, वरळी नाका, पवई, सांताक्रूझच्या मोतीलाल नगर आणि इतर ठिकाणी अशा ९० बसची तोडफोड करण्यात आली आहे. या मध्ये ४ चालक गंभीर जखमी झाले. तर काही आंदोलनकर्त्यांनी पत्रकारांशीही गैरवर्तवणूक केल्याच्या घटना विविध ठिकाणी घडल्या आहेत.


धरपकड सुरू

या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांची धरपकड सुरू केली. पोलिसांनी दोन दिवसांत विविध पोलिस ठाण्यात १६ गुन्हे नोंदवून आतापर्यंत ३०० जणांना ताब्यात घेतलं. तर उर्वरित आरोपींची सीसीटीव्हीच्या माध्यमातून ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिस उपायुक्त सचिन पाटील यांनी सांगितलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा