रस्ते, नाले आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर आता मुंबई पोलिस थेट गुन्हा नोंदवणार आहेत. पालिका आणि पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानानं मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी 'कचरा मुक्त अभियान' सुरू करण्यात आलं आहे. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली.
मुंबईत महापालिकेच्या २४ वार्डात आता मुंबईच्या ९४ पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीनं दर शनिवारी व रविवार स्वच्छता मोहिंम राबवण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत स्थानिक पोलिस ठाणे आणि पालिका कर्मचारी असं २०० जणांचं पथक प्रत्येक वार्डात साफसफाई करणार आहे. या मोहिमेअंतर्गत झोपडपट्टी परिसर, नाल्यालगतच्या वस्त्यांमध्ये पोलिस आणि पालिका कर्मचारी मोठ्या साफसफाई मोहिम राबवणार आहेत. तसंच मुंबईत क्लिन अप मार्शल आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीनं नाल्यात, उघड्यावर घाण टाकणारे, थुंकणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर आता मुंबई पोलिस थेट पोलिस अधिनियम १९५१ नुसार कलम २२ व नियम ११५ अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई केली जाणार असल्याचे बर्वे यांनी सांगितलं.
सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय नसतो, एकमेकांना सहकार्य करत नाही अशा तक्रारी असतात. परंतु, मुंबई पोलिस आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त मोहिमेतून कचरामुक्त मुंबई अभियान सुरू करण्यात आलं आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. लोकांच्या सवयी बदलताना प्रबोधनाबरोबरच शासनही आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
मुंबईतील मंदिरं, रस्त्यावरील नाके, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी पाळीव जनावरांना बांधून त्यांना त्याच ठिकाणी चारा दिला जातो. त्या जनावरांची विष्ठा व मलमूत्रामुळं तो परिसर अस्वच्छ होतो आणि मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. त्यामुळं भाजप नगरसेविका नेहला शहा यांनी महापालिका प्रशासनाकडं अशा लोकांवर कारवाईचा बडगा उभागण्याची मागणी केली होती. त्याला महापालिका प्रशासनानं सहमती दर्शवली आहे. त्यामुळं सार्वजनिक ठिकाणी पाळीव जनावरांद्वारे होणाऱ्या अस्वच्छतेस कारणीभूत ठरणाऱ्यांवर १० हजार रुपये महापालिका दंड आकारणार आहे. तर लहान जनावरांसाठी ६ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
हेही वाचा -
मागण्या मान्य न झाल्यास संपावर ठाम, बेस्ट कर्मचाऱ्यांचा इशारा
मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीचा मुहुर्त ठरला