गर्लफ्रेंडसमोर अपमान करणे वकिलाला पडलं महाग


गर्लफ्रेंडसमोर अपमान करणे वकिलाला पडलं महाग
SHARES

गर्लफ्रेंडसमोर अपमान केल्याच्या रागातून एका प्रियकराने वकिलाला धडा शिकवण्यासाठी मित्राच्या मदतीने त्याच्यावर हल्ला करत, त्याची सोनसाखळी चोरुन पोबारा केल्याची घटना किंग्ज सर्कल येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी अनिश डावरे (२५) आणि सुफियान जमादार (२५) यांना अटक केली आहे.


संपूर्ण प्रकार

अँटॉप हिल परिसरात राहणारा अनिश हा काही दिवसांपूर्वी किंग्ज सर्कल येथील पाच उद्यानात त्याच्या प्रेयसीसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी काही अल्पवयीन मुलं त्या उद्यानातील आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या पाडण्यासाठी तेथे आली होती. झाडावर दगड मारून ही मुलं कैऱ्या पाडत असताना त्यातील एक दगड उद्यानात आलेल्या एका व्यक्तीला लागला. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. 

हा वाद मिटवण्यासाठी अनिश पुढे सरसावला. त्या व्यक्तीच्या एका वकील मित्राने वादात उडी घेत, अनिशला चांगलंच सुनावलं. अनिशचा सर्वांसमोर झालेला अपमान सहन न झाल्याने प्रेयसी तेथून रागाच्याभरात निघून गेली. 


म्हणून सोनसाखळी पळवली

प्रेयसीसोबत कायमचं संबध तुटल्याने चिडलेल्या अनिशने त्या वकिलाचा पाठलाग करून त्याची माहिती मिळवली. त्यानंतर काही दिवसांनी अनिशने त्याचा मित्र सुफियानसोबत त्या वकिलावर हल्ला करत, त्याची सोन्याची चैन हिसकावून तेथून पळ काढला. या प्रकरणी पीडित वकिलाने पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने अनिश आणि त्याचा मित्र सुफियानची ओळख पटवत पोलिसांनी त्यांना अटक केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा