डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा आर्थर रोड जेलमध्ये मृत्यू

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मृत्यू झाला आहे.

डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा आर्थर रोड जेलमध्ये मृत्यू
SHARES

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मृत्यू झाला आहे. ऑर्थर रोड कारागृहात मृत्यू झाला असून, पोलिसांनी लकडावलाला जे जे रुग्णालयात नेलं होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. युसूफ लकडावाला कॅन्सरने त्रस्त होता. मनी लाँडरिंगसह पैशाच्या अफरातफरी प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती. २०१९ मध्ये जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रामध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली बिल्डर युसूफ लकडावालाला (७६) अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती.

युसूफ लकडावाला हा मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर तर होताच, शिवाय तो बॉलिवूड आणि डी गँगचा मोठा फायनान्सरही होता. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारी असलेल्या लकडावालाला अटक करण्यात झाली होती. प्रसिद्ध अभिनेत्री साधना यांना २०१० मध्ये सांताक्रुज येथील जमिनीसाठी धमकावल्याप्रकरणी साधना यांनी बिल्डर युसूफ लकडावाला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र न्यायलयाने याप्रकरणी लकडावाला यांची निर्दोष सुटका केली होती.

युसूफ लकडावाला यांच्याविरोधात एप्रिल २०१९ मध्ये आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा दाखल केला होता. हाच गुन्हा आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे नोंदवून तपास सुरु केला. हैदराबादच्या नवाबाची खंडाळा येथील ५० कोटी रुपयांची जमीन अल्प किमतीत लाटल्याचा आरोप होता. खंडाळ्याच्या या जमिनीशी संबंधित बिल्डरच्या काही संशयास्पद व्यवहारांची ईडी चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील खंडाळा इथं हैदराबादचे नवाब हिमायत नवाज जंग बहादूर यांच्या मालकीच्या जमिनीशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंगचे हे प्रकरण आहे. ही जमीन ५० कोटी रुपयांची असल्याचे म्हटले जाते. मात्र लकडावाला यांनी जमीन ताब्यात घेण्यासाठी सरकारी अधिकारी, इस्टेट एजंट्स आणि इतर आरोपींना सुमारे ११.५ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. अधिकृत नोंदीनुसार सर्व्हे नंबर १०४ (सीटीएस नंबर ११, ११ए, ११बी) वरील जागा ४ एकर आणि ३८ गुंठ्यांची आहे.

मावळ तालुका उपनिबंधक जितेंद्र बडगुजर यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर लकडावाला आणि इतरांविरूद्ध फसवणूक, कट रचणे अशा आरोपांखाली भादंवि कलम 465, 466, 467, 468, 471, 420, 120-B आणि 201 नुसार, तर भारतीय नोंदणी अधिनियम कलम 82 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा