कारचे पार्ट्स चोरणारी टोळी जेरबंद

 Kalachauki
कारचे पार्ट्स चोरणारी टोळी जेरबंद

काळाचौकी - दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे पार्ट्स चोरणाऱ्या चौघांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. सुजय गदादे (22), संदेश विरमणी (22), जयेश वायकर(19) आणि पंकज काटे अशी आरोपींची नावे आहेत. हे चौघे महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.

काळाचौकी परिसरातून अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे स्पेअर पार्ट्स चोरी होत असल्याच्या तक्रारी काळाचौकी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्यास सुरुवात केली होती. अशातच काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान देशमाने रात्रीची गस्त घालत होते. एवढ्यात चार तरूण संशयित हालचाल करत असल्याचे दिसल्याने देशमाने यांनी त्यांना हटकले. मात्र त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. या वेळी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या चौघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांची चौकशी केली असता, वाहनांचे स्पेअर पार्ट्स चोरी करत असल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच यापूर्वी देखील अशा प्रकारचे स्पेअर पार्ट्स चोरल्याची कबुली या संशयितांनी दिली.

Loading Comments