सोनसाखळी चोरांनी घेतला वृद्ध महिलेचा बळी


सोनसाखळी चोरांनी घेतला वृद्ध महिलेचा बळी
SHARES

सोनसाखळी चोरामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वाकोल्यात उघडकीस आली आहे. वृद्ध महिला रिक्षातून प्रवास करत असताना या सोनसाखळी चोरांनी पाठलाग करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. या दुर्घटनेत जखमी झालेली वृद्ध महिला त्या दिवसापासून बेशुद्ध अवस्थेतच होती. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली असून दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी दोन सोनसाखळी चोरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे.


काय घडला प्रकार?

मूळच्या ठाण्याच्या असलेल्या कांचन कुडाळकर (६५) या काही कामानिमित्त १६ जानेवारी रोजी जोगेश्वरीला आल्या होत्या. दुपारी काम आटोपल्यानंतर त्यांनी वांद्रे येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली होती. कांचन यांची रिक्षा सांताक्रूझच्या वाकोला सिग्नलजवळ उभी होती. त्यावेळी त्या या रिक्षाच्या एका कोपऱ्यात बसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या अंगावर मौल्यवान दागिने होते. सिग्नल सुटल्यानंतर कांचन यांची रिक्षा पुढे जाऊ लागली. त्यावेळी मागून आलेल्या सोनसाखळी चोरांनी कांचन यांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला.


धावत्या रिक्षातून त्या खाली पडल्या

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कांचन या देखील घाबरल्या. धावत्या रिक्षात चोरांच्या ताकदीपुढे कांचन यांचा प्रतिकार निष्फळ ठरला. एका क्षणाला चोरांनी गळ्यातील मौल्यवान दागिने हिसकावण्यासाठी हाताने दिलेल्या झटक्याने कांचन यांचा तोल गेला आणि त्या धावत्या रिक्षातून खाली पडल्या. रस्त्यावरील इतर वाहनचालक त्या चोरांना पकडण्यासाठी जाणार, तोच त्यांनी तिथून पळ काढला.


रिक्षाचालकानेही काढला पळ

या दुर्घटनेत बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या कांचन यांना पाहून रिक्षा चालकानेही पळ काढला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत कांचन यांना तातडीने उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढे कांचन यांच्या कुटुंबियांनी त्यांना ठाणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या दुर्घटनेनंतर कांचन या शुद्धीवर आल्याच नाहीत. मृत्यूशी कडवी झुंज देताना सोमवारी कांचन यांचा मृत्यू झाला.


सीसीटीव्ही फुटेजवरून शोध सुरू

या प्रकरणी वाकोला पोलिसांनी दोन सोनसाखळी चोरांसह रिक्षाचालकावरही गुन्हा नोंदवला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलं आहे. त्या दोन्ही सोनसाखळी चोरांसह या चोरीत रिक्षा चालकही सहभागी असल्याचा संशय वाकोला पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


पोलिसांचं आवाहन

  • महिलांनी शक्य तेवढे मौल्यवान दागिन्यांचे प्रदर्शन करू नये
  • अंगावरील दागिने झाकावेत
  • चालताना शक्यतो पदपथाचा वापर करा
  • एकटे रिक्षातून प्रवास करताना दरवाजाच्या कडेला बसणं टाळावं
  • टॅक्सीतून किंवा खासगी कारमधून प्रवास करताना गाडीची काच अर्ध्याच्या वर ठेवावी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा