फेंटानिल ड्रग्जच्या विळख्यात तरूण!

आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही धडकी भरवणाऱ्या ‘फेंटानिल ड्रग्ज’ची तस्करी आता भारतात होऊ लागली आहे. आतापर्यंत 'फेंटानिल' हा अंमली पदार्थ फारसा कुणाच्या परिचयाचा नव्हता.

फेंटानिल ड्रग्जच्या विळख्यात तरूण!
SHARES

आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही धडकी भरवणाऱ्या ‘फेंटानिल ड्रग्ज’ची तस्करी आता भारतात होऊ लागली आहे. आतापर्यंत 'फेंटानिल' हा अंमली पदार्थ फारसा कुणाच्या परिचयाचा नव्हता. मात्र नायजेरियन तस्करांनी पैशांच्या हव्यासापोटी कोकेनसह भारतात 'फेंटानिल'ची तस्करी सुरू केली. आता तर औषध कंपन्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या केमिकलचा वापर करून तस्करांनी 'फेंटानिल' ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे पदार्थ बनवण्यास सुरूवात केल्याचं मुंबई पोलिसांच्या एका कारवाईतून पुढं आलं आहे.

ड्रग्ज तस्करीचा अमेरिकन मार्ग

अमेरिका आणि युरोपातील अंडरवर्ल्डने ड्रग्स तस्करीच्या माध्यमातून आपलं बलाढ्य साम्रज्य उभं केलं आहे. हे पाहून सोने-चांदीची तस्करी करणाऱ्या भारतातील तस्करांनीही या धंद्यात आपलं नशीब आजमवायचं ठरवलं. हळुहळू करत भारतातील तस्करांनी नशेच्या धंद्यात चोरटं पाऊल टाकलं. सुरूवातीला अमेरिका, युरोपातून अफू, गांजा, चरस आणि ८०-९० च्या दशकात कोकेन, ब्राऊन शुगर भारतात घेऊन येत या ड्रग्ज माफियांनी  तरुणांना पोखरण्यास सुरवात केली.

पालकांसमोर मोठं आव्हान

आता तर या ड्रग्ज माफियांनी नशेच्या धंद्यात इतका जम बसवला आहे की, कोकेन, ब्राऊन शुगरला मागे टाकतील असे भयानक नशा देणारे अंमली पदार्थ ते भारतात आणू लागले आहेत. यामध्ये फेंटानिल, मशरूम, फ्लॅक्का, स्पाईस अशा घातक आणि तरूणांचं आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या ड्रग्जचा समावेश आहे. वैद्यकीय चाचणीतही हे ड्रग्ज घेतल्याचं उघड होत नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेबरोबर पालकांसमोरही नवं आव्हान उभं राहिलं आहे. 

भारतीतील ड्रग्जचा व्यापार गुंतागुतींचा आहे. झोपडपट्टीपासून ते आलिशान बंगल्यांपर्यंत हे मायाजाल पसरलं आहे. त्यामुळे पोलिसांनी ड्रग्ज तस्करांना कितीही रोखण्याचा प्रयत्न केल्यास हे ड्रग्ज तस्कर तस्करीचे नवनवे मार्ग शोधून काढतातच. त्यामुळेच की काय या धंद्यातील उलाढालीचा अंदाज सुरक्षा यंत्रणांना येत नाही.


'असं' बनतं 'फेंटानिल'

अमेरिकेतील मेक्सिको शहरातील डोंगराळ भागात कोकोची असंख्य झाडे आहेत. या झाडांच्या पाल्याचा उपयोग सुरूवातीला औषध निर्मितीसाठी केला जात होता. मात्र कालांतराने त्यात रासायनिक प्रक्रिया करून त्याचं कोकेन बनवण्यास सुरूवात झाली. कोकोच्या झाडांचा पाला काढून तो वाळवला जातो. त्यानंतर तो पाला गरम पाण्यात टाकून त्यात इथेनाॅल आणि इतर रासायनिक द्रव्य टाकून तो घट्ट केला जाते.

३० हजार जणांचा मृत्यू

घट्ट केलेल्या पदार्थातून पाणी काढून टाकण्यासाठी ते एका कपड्याद्वारे गाळलं जातं. गाळलेला घट्ट पदार्थ एका विशिष्ट तापमानाखाली ओव्हनसारख्या मशीनमध्ये गरम केल्यानंतर  टणक होतो. त्याच टणक पदार्थाची भुकटी करून कोकेन आणि 'फेंटानिल'सारखं ड्रग्ज बनवलं जातं. या फेंटानिलमुळे अमेरिकेत ३० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच 'फेंटानिल'वर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे. शिवाय हे  ड्रग्ज बनवण्यासाठी ज्या केमिकलचा वापर करण्यात येतो, त्या केमिकलच्या वापरावरही  मोठ्या प्रमाणावर अटी जारी करण्यात आल्या आहेत.

'डॉक्‍टर शॉपिंग'चं आव्हान

भारतातील ड्रग्ज माफियांनी आपल्या पाताळयंत्री कारवायांसाठी डॉक्‍टर मंडळींचाही राजरोस वापर सुरू केला आहे. परदेशातून औषधी केमिकल्सची आयात मोठ्या प्रमाणात होत असल्याने हे ड्रग्ज तस्कर चरस, गांजा या पारंपरिक पदार्थांकडून केमिकल्सच्या तस्करीकडे वळले आहेत. हे तस्कर डॉक्‍टरच्या चिठ्ठीद्वारे "ओव्हर द काऊंटर' औषधं खरेदी करून त्यातील प्रतिबंधीत रसायने वेगळी करतात. त्यानंतर ही रसायने परदेशात ड्रग्ज निर्मितीसाठी पाठवतात. तस्करांच्या या नव्या मोडस ऑपरेंडीला 'डॉक्‍टर शॉपिंग' असं म्हटलं जातं. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या (एनसीबी) तपासात यावर झगझगीत प्रकाश पडला आहे.  

'असा' लागला माग

या तस्करीला आळा घालण्यासाठी सध्या तरी भारतात  कोणताही प्रभावी उपाय नसल्याने या ड्रग्ज माफियांनी तपास यंत्रणांनुढं मोठं आव्हान निर्माण केलं आहे.  काही दिवसांपूर्वीच मुंबईतील वाकोला इथून १०० किलो 'फेंटानिल' ड्रग्जचा साठा मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाच्या पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणात पुढं राजस्थानमधील एका केमिकल कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली. 

'या' केमिकलचा वापर

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बाजारातील अनेक औषधांतील केमिकल वेगळी करून त्याद्वारे ड्रग्ज तयार करता येतं. त्यामुळे परदेशात आणि भारतातही अशी काही औषधे प्रतिबंधीत करण्यात आली आहेत. फक्त डॉक्‍टरांच्या निर्देशानुसारच ती ग्राहकाला देता येतात; पण भारतीय बाजारातील त्रुटी हेरून तस्कर एकाच चिठ्ठीद्वारे शहरातील अनेक दुकानांतून ही औषधं खरेदी करतात. कधीकधी औषधविक्रेते डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवायच अशी प्रतिबंधीत औषधे विकतात. त्यानंतर हा औषधसाठा रासायनिक कारखान्यात एकत्र करून त्यातील एफिड्रीन व कॅटामाईन ही प्रतिबंधीत रसायने वेगळी केली जातात.

यंत्रणेला चकवा

केमिकल ड्रग्स वेगळं करण्याचं काम कोणत्या कारखान्यात सुरू आहे, याचा शोध लावणं तसं अवघड आहे. याआधी ठराविक औषधांच्या खपात अनपेक्षितपणे वाढ झाल्यास त्याठिकाणी छापा टाकून तस्करांचा छडा लावला जात असे; पण 'डॉक्‍टर शॉपिंग' या नव्या कार्यप्रणालीचा वापर करून तस्कर एकाच विभागातील दुकांनातून प्रतिबंधीत औषधं न घेता शहरातील विविध दुकांनातून औषधं खरेदी करीत असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणं अमली पदार्थविरोधी विभागाला कठीण जात आहे.

तंत्रज्ञानाचा वापर

परदेशात 'डॉक्‍टर शॉपिंग'ला आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. डॉक्‍टरांचा संगणक व औषधांच्या दुकांनामधील संगणक एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे डॉक्‍टरांनी एखाद्या रुग्णाला हे औषध लिहिल्यास त्याची पूर्ण माहिती या यंत्रणेद्वारे औषध विक्रेत्यांना कळते. त्यामुळे 'ओव्हर द काऊंटर' औषधांची खरेदी करणं तस्करांना कठीण जातं. पण आपल्याकडे अद्याप अशी यंत्रणा अस्तित्वात आलेली नाही. परदेशात होणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे तिथं ही प्रतिबंधीत केमिकल्स मिळविणं कठीण जात आहेत. परिणामी, आंतरराष्ट्रीय तस्कर त्यासाठी मोठी रक्कम देण्यास तयार असतात. याचाच फायदा घेऊन भारतीय तस्कर मोठ्या प्रमाणात ही केमिकल्स भारताबाहेर पाठवून कमाई करीत असल्याची माहिती एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिली. 


व्यवहार झाले 'हायटेक'

केमिकल्स खरेदी-विक्रीचा व्यवहार दिसतो तितका सोपा नाही. हा व्यवहार 'बीट काईन'वर होतो. डार्क आणि डिप अशा दोन प्रकारात हा व्यवहार होतो. इंटरनेटवरील या तस्करांच्या साईटवर मेंबरशीप घ्यावी लागते. 'बीट काईन'वर ही मेंबरशीप मिळते. एक 'बीट काईन' १ लाखाहून अधिक रुपयांचा असतो. या इंटरनेट साईटवर मेंबर होण्यासाठी काही लाख रुपयांचे 'बीट काईन' खरेदी करावे लागतात. मात्र नुसते 'बीट काईन' खरेदी करून देखील तुम्हाला मेंबर केलं जाईल याची खात्री नसते.

मेंबरशीप मिळणं अवघड

जोपर्यंत या तस्करांना तुम्ही खरेच अमली पदार्थांच्या खरेदीसाठी मेंबर बनत आहात याची खात्री पटत नाही. तोपर्यंत तुम्हाला मेंबर करून घेतलं जात नाही. मुंबई पोलिसांनी तस्करांना जाळ्यात अडकवण्यासाठी अशा प्रकारच्या 'बीट काईन'ची खरेदी करून मेंबर होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना अपयश आलं. काही दिवसांपूर्वीच अंमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलिसांनी कांदिवलीत 'बीट काईन'द्वारे एलएसडी पेपरची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. यातील मुख्य आरोपी फरहान अखील खान हा या इंटरनेटवरील साईटवर मेंबर असल्याचं तपासात पुढं आलं होतं. त्यावेळी त्याने तब्बल साडे दहा लाख रुपये या एलएसडी पेपरसाठी मोजल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं होतं.

परदेशातून 'अशी' केली जाते तस्करी

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज बाजारात 'फेंटानिल' व 'कोकेन'ला मोठी मागणी आहे. मेक्सिको तसंच केनियातून ड्रग्ज माफिया  ड्रग्ज पेडलरद्वारे आपला माल भारतात पाठवतात. ड्रग्ज पेडलर १ किलो वजनाचं कोकेन छोट्या कॅप्सूलमध्ये भरून ते कॅप्सूल गिळतात. हे  कॅप्सूल पोटात फुटल्यास पेडलरचा जागीच मृत्यू होतो. त्यामुळे या कॅप्सूल पोटात फुटणार नाहीत याची काळजी घेऊन बनवल्या जातात. कॅप्सूल गिळून भारतात आल्यावर हा पेडलर दिल्ली किंवा मुंबईतील हाॅटेलमध्ये उतरतो. तिथं तो बाथरूमवाटे ड्रग्ज कॅप्सूल पोटातून बाहेर काढतो. हे कॅप्सूल साफ करून भारतातील हँडलरला दिलं जातं.  त्यानुसार हँडलर ते तस्करांपर्यंत पोहोचवतो. या प्रत्येक खेपेमागे ड्रग्ज आणणारा आणि हँडलर या दोघांनाही १० ते १५ लाख रुपये मिळतात. केनियात या पैशांची किंमत दुप्पट असते. विशेष म्हणजे एका फेरीनंतर या तस्कराला पुढील ५ वर्षे त्या देशात पाठवलं जात नाही.


तरूणांना लागलं वेड

हे अंमली पदार्थ काॅलेजच्या तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्‌स अॅप ग्रुप किंवा फेसबुकवर सांकेतिक भाषेत पार्टीचं आयोजन केलं जाते. या पार्टीत फिल हाय आणि ट्रान्सध्ये नेण्यासाठी कोकेन, केटामाइन आणि टूसीबीसारखे अंमली पदार्थ विकले जातात. त्यावर तरुणपिढी लाखो रुपयांची उधळण करते. काही पंचतारांकीत हॉटेल्समध्ये अंमली पदार्थांचे व्यवहार होतात. त्याचबरोबर मोठ मोठ्या ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कुरिअरच्या माध्यमातून तस्कर हे अंमली पदार्थ पार्टीत आणतात. त्यामुळे शहरातील पंचतारांकीत हॉंटेल, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि कुरिअर कंपन्या पोलिसांच्या रडारवर आहेत.

मशरूमला वाढती मागणी

तरूणांमध्ये लोकप्रिय असलेल्या ड्रग्जमध्ये मॅजिक मशरूमचाही समावेश आहे. या प्रतिबंधीत मशरूमसह काही दिवसांपूर्वी  कोलकात्यातील एका डिस्क जॉकीला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून २.४९ ग्रॅम मॅजिक मशरूम, २० एलएसडी ब्लॉट्‌स, ९ गोळ्या(एमडीएम) व १३.५ ग्रॅम इक्‍टसी सारखे पदार्थ हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी आतापर्यंत विवेक शर्मा, रिषभ शर्मा व डिक्‍स जॉकी दीप चक्रवर्ती यांना अटक झाली आहे. 

जास्त काळ नशा

भाजीच्या मशरूमच्या तुलनेत या मशरूमची  चव थोडी कडू लागते. त्यामुळे चॉकलेट सीरप टाकून या मशरूमचं सेवन केलं जातं. या पदार्थाची नशा अगदी ८ तास राहते. रासायनिक ड्रग्स एमडी व एलएसडीपेक्षाही ही नशा जास्त काळ टिकते. आरोपींच्या चौकशीत आरोपी बीट कॉईनच्या माध्यमातून डार्क नेटवरून हे अंमली पदार्थ मागवायचे. त्यांची विक्री पार्ट्यांमध्ये ग्राहकांना हेरून केली जायची. मशरूमच्या २ हजार जातींपैकी १४४ जातींमध्ये नशा देणारा घटक असतो. त्यामुळे अमेरिका खंडानंतर गेल्या काही वर्षांत पूर्व आशियात त्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा या सारख्या देशांनी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मॅजिक मशरूमवर बंदी आणली आहे. भारतात या मशरूमवर बंदी नाही, पण त्यातील नशेच्या घटकांवर बंदी आहे.


स्पाईसची वाढती क्रेझ

युरोपातील अनेक तरुण-तरुणींना आपल्या विळख्यात ओढल्यानंतर सध्या स्पाईस नावाचं नवं ड्रग्ज राज्यात खूप प्रचलीत झालं आहे. गांजावर विशिष्ट रसायनिक प्रक्रिया करुन हे ड्रग्ज तयार केलं जातं. कृत्रिम गांजा असलेलं हे ड्रग्स वैद्यकीय चाचणीत सापडत नसल्यामुळे तरुणी या ड्रग्जच्या  अधिक आहारी गेल्या आहेत. पोलिसांकडे सध्या याबाबत एकही गुन्हा दाखल नसला, तरी या डॅग्जचं सेवन करणारे तरुण-तरुणी वैद्यकीय उपचारासाठी तज्ज्ञांकडे येत आहेत. स्पाईस, के टू, ब्लॅक मांबा, ब्लॅक झोंबी या नावाने प्रचलित असलेलं हे ड्रग्ज युकेमध्ये फार प्रचलीत झालं होतं. त्यानंतर मुंबईतही अनेक तरूण-तरुणी या कृत्रिम गांजाला बळी पडत आहेत. 

सनदी अधिकाऱ्याची मुलगी आहारी

तीन महिन्यांपूर्वी एका सनदी अधिकाऱ्याची मुलगी या ड्रग्जच्या आहारी गेली होती. तिच्या आईला संशय आल्यानंतर विचारणा केली. पण, कोणत्याही प्रकारचा नशा करत नसल्याचं तिनं सांगितलं. हवं तर टेस्ट करा असंही ती सांगायची. पण, मुलीची वागणूक संशयास्पद असल्याने तिला भायखळा येथील मसिना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्‍टरांच्या तपासणीत ही मुलगी ड्रग्जचं सेवन करत असल्याची लक्षणं आढळली. मात्र, तिच्या लघवीत ड्रग्जचे अंश सापडले नाही. त्यामुळे डॉक्‍टरही आश्‍चर्यचकित झाले. अनेक वेळा या मुलीची तपासणी करण्यात आली. पण, काहीच सापडत नव्हतं. 


अखेरीस तिचं समुपदेशन केल्यावर ती स्पाईस ड्रग्ज घेत असल्याची कबुली तिने दिली. स्पाईस हे गांजाहून अधिक नशा देतं. पण त्याचे दुष्परिणाम फार भयानक आहेत. त्याचं अतिसेवन झाल्यास माणूस एखाद्या झोंबीप्रमाणे म्हणजे निर्जीव वस्तूसारखा पडून राहतो. त्यामुळे हे ड्रग्ज झोंबी म्हणून प्रसिद्ध आहे. या ड्रग्जचं सेवन करणाऱ्या व्यक्तीला वेडही लागू शकतं. गांजा सेवन करणाऱ्याच्या शरीरात त्याचे अंश सुमारे २० दिवस सापडतात, पण स्पाईस कृत्रिम ड्रग्ज असल्यामुळे ते डिटेक्‍ट होत नाहीत.

नायजेरियन तस्करांची वाढती मक्तेदारी

मुंब्रा, दिवा, मिरा रोड, वसई, नवी मुंबईतील काही भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या नायजेरियन नागरिकांच्या गुन्हेगारी विषयक हालचाली रोखण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. या नायजेरियन नागरिकांनी एमडी, एफेड्रीन, अशा अनेक नव्या अंमली पदार्थांची तस्करी भारतात सुरु केल्याने या नव्या अमली पदार्थांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. बेकायदेशीररित्या भारतात आलेले ९५ टक्के नायजेरियन ऑनलाईन फसवणुकीचे आणि अंमलीपदार्थ तस्करीचं काम करतात. अंमली तस्करीप्रकरणी पोलिसांनी २०१६ मध्ये १६ नायजेरियन नागरिकांना अटक केली होती. तर २०१७ मध्ये सुमारे २३ नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली होती. या नायजेरियन टोळींच्या अनेक वस्त्या मुंबईबाहेर वसू लागल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.हेही वाचा- 

२ कोटींच्या ड्रग्जसह टांझानियाच्या महिलेस अटक, एक्सप्रेसमधून करत होती प्रवास

'मॉब लिचिंग'चे गुन्हे धार्मिक तेढ, राजकीय स्वार्थासाठीचसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा