हमाल बनला अट्टल गुन्हेगार


हमाल बनला अट्टल गुन्हेगार
SHARES

एखाद्या सिनेमातील दृष्याप्रमाणे धावत्या एक्स्प्रेस गाडीच्या माल डब्यात चोरी करणाऱ्या हमालाला रेल्वे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी 'फिल्मी स्टाइल'नेच पाठलाग करून ताब्यात घेतले. घाटकोपर ते विक्रोळी स्थानकादरम्यान हा प्रकार घडला असून अटकेत असलेल्या आरोपीचे नाव शंकर देवराज नायडू (३५) ऊर्फ जम्बो असे आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर आणि विक्रोळी स्थानकादरम्यान शनिवार २९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता ज्ञानेश्वर एक्स्प्रेस सिग्नलमुळे उभी होती. यावेळेस गस्तीवर असणारे रेल्वे पोलीस कर्मचारी सचिन लोंढे आणि सुमीत कुमार यांना शंकर नायडू एक्स्प्रेसच्या माल डब्यातून संशयास्पदरितीने तीन मोठे पार्सल रुळावर फेकताना  दिसला. त्यांनी शंकरला हटकल्यावर त्याने थेट रुळांवरुन पळ काढायला सुरूवात केली. त्याला पळताना बघताच या दोघा पोलिसांनीही त्याचा पाठलाग सुरू केला. अखेर काही अंतरावर गेल्यावर शंकरच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आले.


वाईट संगतीचा परिणाम-

शंकर नायडू हा सुरुवातीच्या काळात सीएसटी टर्मिनसवर हमाल म्हणून काम करत होता. येथे त्याने हमाल म्हणून २ वर्षे प्रामाणिकपणे काम केले. पण त्यानंतर त्याला वाईट संगत लागली. त्यातूनच तो चोऱ्याही करायला लागल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सीएसटी टर्मिनसकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान सिग्नल देण्यात येतो. याच काळात भुरटे चोर संधी साधून माल डब्यातील पार्सल चोरतात. अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यात शंकर पोलिसांना हवा होता. त्याचा शोध सुरू असतानाच तो रंगेहात पोलिसांच्या तावडीत सापडल्याचे घाटकोपर आरपीएफ उपनिरीक्षक छेदीलाल कनौजिया यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा