लग्नाच्या बेडीत अडकलेल्या दाम्पत्यावर, पोलिसांच्या बेडीत अडकण्याची वेळ

थोडे थोडे म्हणता त्यांच्या लग्नाला १५० हून अधिक पाहुणे उपस्थित राहिल्याने पोलिसांनी नव दाम्पत्यासह संपूर्ण वऱ्हाडावर गुन्हा नोंदवला

लग्नाच्या बेडीत अडकलेल्या दाम्पत्यावर, पोलिसांच्या बेडीत अडकण्याची वेळ
SHARES

कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे राज्यात लाॅकडाऊन सुरू आहे. लाॅकडाऊनच्या नियमानुसार सद्यस्थितीत लग्न समारंभ, वाढदिवस, सभा-संमेलनं अशा जाहीर कार्यक्रमांवर पूर्णत: बंदी आहे. या स्थितीचं भान राखत काही जोडप्यांनी अत्यंत साधेपणाने, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकून घेतल्याची अनेक उदाहरणं आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितली, वाचली असतील. परंतु कर्जतमधील एका जोडप्याला किंबहुना दोघांच्याही कुटुंबियांना या लाॅकडाऊनच्या नियमांचा विसर पडला. सरकारने 'मिशन बिगीन अगेन' नुसार लाॅकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता देताच, या जोडप्यानेही आपलं 'मिशन बिगीन' केलं; पण चुकीच्या पद्धतीने. थोडे थोडे म्हणता त्यांच्या लग्नाला १५० हून अधिक पाहुणे उपस्थित राहिले. ही बाब पोलिसांना समजताच  पोलिसांनी नव दाम्पत्यासह संपूर्ण वऱ्हाडावर गुन्हा नोंदवला.

हेही वाचाः सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठ ६५ व्या स्थानावर

‘मुंबई मिरर’ ने दिलेल्या वृत्तानुसार कर्जतच्या मुर्डे परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचं लग्न ठरलं आणि काही दिवसांतच कोरोनामुळे राज्यात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. लाॅकडाऊन संपल्यावर धुमधडाक्यात लग्न करून असा दोन्ही पक्षांकडील कुटुंबियांचा कयास होता. परंतु लाॅकडाऊन वाढतच चालल्याने लग्नाचं गाडंही अडकून पडलं होतं.  त्यातच राज्य सरकारने 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत लाॅकडाऊनमध्ये शिथितला देताच दोन्ही बाजूच्या कुटुंबियांनी लग्न झटपट उरकण्याचं ठरवलं. त्यानुसार मोजक्या म्हणजेच ५० नातेवाईकांच्या उपस्थित लग्नसोहळा करण्याचंही ठरवण्यात आलं. पण या लग्नाला थोडे थोडे म्हणता नवरा आणि नवरीकडून तब्बल १५० माणसं उपस्थित राहिली. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी लग्नाचा हाॅल उपलब्ध करून देणाऱ्या हाॅलमालकासह ५ जणांवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्याप्रकरणी १८८, २६९,२७० अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  

हेही वाचाः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण

लाॅकडाऊनच्या काळात सरकारी नियमानुसार सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं गरजेचं आहे. लग्न सोहळ्यासाठी आधी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. लग्नाला केवळ ५० व्यक्ती उपस्थित राहतील, या अटीवर परवानगी देण्यात येते. या लग्न समारंभासाठी दोन्हीपैकी एकाही कुटुंबाने पोलिसांची  परवानगी घेतलेली नव्हती. या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते हृषिकेश जोशी यांनी या विषयी पहिल्यांदा आवाज उठवला. ‘माझा उद्देश त्या दाम्पत्याला त्रास देण्याचा नव्हता. तर हाॅल मालकाकडून कशा प्रकारे नियमांचं उल्लघंन केलं जात आहे. हे दाखवून देण्याचा होता. असं जोशी यांनी मुंबई मिररशी बोलताना सांगितलं. अशा रितीने एका चांगल्या समारंभाचा विचका झाला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा