त्याला फसवायचं होतं 200 पंचतारांकीत हॉटेलांना!

Cuffe Parade
त्याला फसवायचं होतं 200 पंचतारांकीत हॉटेलांना!
त्याला फसवायचं होतं 200 पंचतारांकीत हॉटेलांना!
See all
मुंबई  -  

एखाद्या हॉटेलमध्ये पोटभर खाऊन झाल्यावर बिल देण्यास नाकारणारा नंतर त्याच हॉटेलात भांडी घासतोय, असे अनेक हास्यास्पद किस्से आपण सिनेमा, मालिकांमध्ये पाहिले असतील वा कधी कुणाकडून ऐकलेही असतील. पण एका ठकाला केवळ खाण्याचाच नव्हे, तर पंचतारांकीत हॉटेलात राहण्याचा इतका छंद जडला होता की याच हौसेपोटी तो थेट जाऊन पडला तुरूंगात. या ठकाने कुलाब्यातील ताज प्रेसिडेन्सी हॉटेलात मुक्काम ठोकून खाण्यापिण्यासह तेथील सर्व आलिशान सुखसोईंचा आस्वाद घेतला. या सर्व मौजमजेचे बिल 50 हजारांवर गेल्यावर तेथून काढता पाय घेण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. भीमसेन्ट जॉन (61) असे या ठकाचे नाव आहे. तब्बल 200 मोठ्या हॉटेलांना फसवण्याचे त्याचे टार्गेट असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमसेन्टने 4 जूनला कुलाब्यातील ताज प्रेसिडेन्सी हॉटेलात सेंट्रल रिझर्व्हेशनद्वारे रुम बुक केला. बुकींगनुसार त्याने 6 जूनला रात्री 9 वाजता चेक इन केले. आपण एकटे नसून मागून येणारे आपले मित्र या बुकींगचे पैसे देतील, असे त्याने चेक इन करताना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सांगितले.

त्यानंतर त्याने संपूर्ण दिवसभर ताज हॉटेलात मौजमजा केली. पाहिजे ते खाल्ले, सगळ्या सुख सुविधांचा उपभोग घेतला. दुसऱ्या दिवशी रात्री गुपचूप तेथून पळ काढण्याचा त्याचा डाव होता. त्यानुसार रात्री साडेअकरा वाजता भीमसेन्ट हॉटेलबाहेर जाण्यास निघाला. मात्र हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना त्याच्याबद्दल शंका आल्याने त्यांनी त्याला अडवले आणि भीमसेन्टचे बिंग फुटले. या ताज हॉटेलचे बिल थोडे थोडके नव्हे, तर 50 हजार रुपये झाले होते. भीमसेन्टकडे पैसेच नसल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला थेट कफ परेड पोलिसांच्या ताब्यात दिले.

चौकशीत जे काही समोर आले ते ऐकून पोलिस देखील चकीत झाले. भीमसेन्ट जॉन मूळचा तामिळनाडूचा राहणारा आहे. तो पूर्वी ज्या टूअर्स आणि ट्रॅव्हल्सच्या कंपनीत नोकरीला होता, त्या कंपनीच्या मालकाने भीमसेन्टचे पैसे बुडवले होते. मात्र आपले पैसे वसूल करण्यासाठी भीमसेन्ट ना पोलिस ठाण्यात गेला, ना त्याने कोर्टाचा दरवाजा ठोठावला. आपला सगळा राग तो या हॉटेलांवर काढू लागला. ते देखील अनोख्या पद्धतीने.

पंचतारांकीत हॉटेलात बुकिंग केल्यानंतर भीमसेन्ट थातूर मातूर कारणे देऊन चेक इन करायचा. त्यानंतर पैसे न देताच हॉटेलात राहून चैन करणे आणि संधी मिळताच हॉटेलातून पळ काढणे ही त्याची शैली बनली. तब्बल 200 मोठ्या हॉटेलांना फसवण्याचे टार्गेट त्याने ठेवले होते.

यापूर्वी तो 2014 मध्येही अशाचप्रकारे ताज हॉटेलमध्ये राहिल्याचे समोर आले आहे. तामिळनाडूतही त्याच्या विरोधात अशा स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती कफ परेड पोलिसांनी दिली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.