गरजा भागवण्यासाठी तरुणांना लाखोंचा गंडा


गरजा भागवण्यासाठी तरुणांना लाखोंचा गंडा
SHARES

राज्यात डान्सबारवर बंदी असताना ठाण्यात मात्र डान्सबार तेजीत सुरू असल्याची माहिती एका आरोपीने पोलिसांना दिली आहे. महापालिकेत नोकरीचं आमीष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडवणाऱ्या आरोपीने फसवणुकीचे सर्व पैसे डान्सबारमध्ये उधळल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. या आरोपीविरोधात आतापर्यंत फसवणुकीचे ५ गुन्हे दाखल असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलिसांनी दिली आहे.


२८ लाखांचा घातला गंडा

मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लावणार असल्याचं आमीष दाखवत सुरेश रमेश कलव ऊर्फ लतिकेश याने तरुणांना २८ लाख रुपयांना गंडवलं आहे. करिरोड परिसरात राहणाऱ्या सुरेश विरोधात हा पाचवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या मुंब्रा परिसरात राहणाऱ्या सचिन घाडवे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे.


यांनी केली तक्रार

सचिनसह अशा अनेक तरुणांना सुरेशने गंडवल्याची माहिती समोर आली आहे. सुरेशने मुंबई महानगरपालिकेत नोकरी देण्याचं प्रलोभन दाखवून २०१६ ते २०१७ या कालवाधीत २८.१२ लाख रुपये घेतले. त्यानंतर लतिकेशने त्याचा फोन उचलणंही बंद केलं. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं कळल्यानंतर घाडवे यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून शनिवारी लतिकेशला अटक केली. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


यापूर्वी लतिकेश होता पोलिसांच्या अटकेत

सुरेशच्या चौकशीत त्याने आपल्याला नियमित दारू आणि डान्सबारला जाण्याची सवय होती. त्यासाठी पैसे लागत असल्यामुळे गरजा पूर्ण करण्यासाठी आपण तरुणांची फसवणूक करण्यास सुरुवात केल्याची कबुली त्याने दिली. यापूर्वी लतिकेशला काळाचौकी आणि दादर पोलिसांनीही अटक केली होती.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा