नोकरीच्या अामिषानं ४ लाखांना गंडवलं

भांडुपमधील २९ वर्षीय तरुणाला इंडिगो एअरलाईन्समध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तब्बल ४ लाख ९६ हजार ४१९ रुपयांना गंडा घातल्याचं उघडकीस अालं आहे.

नोकरीच्या अामिषानं ४ लाखांना गंडवलं
SHARES

इंजिनीअर, डाॅक्टर, हाॅटेल मॅनेजमेंट, उच्च पदवीधर झाल्यानंतर अापणास गलेलठ्ठ पगाराची नाेकरी मिळावी यासाठी अनेक तरुण प्रयत्नशील असतात. यातील बहुतांश जण देशात काम करण्यापेक्षा परदेशात जाऊन अधिक पैसा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, अशा तरुणांना हेरून त्यांना परदेशात नामांकित कंपनीत माेठ्या पगाराची नाेकरी मिळवून देण्याच्या अामिषाने फसवण्याचे प्रकार वाढत अाहेत. 

 नुकतंच भांडुपमधील २९ वर्षीय तरुणाला इंडिगो एअरलाईन्समध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तब्बल ४ लाख ९६ हजार ४१९ रुपयांना गंडा घातल्याचं  उघडकीस अालं आहे. या प्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली अाहे.

विमान कंपनीत नोकरीचं अामीष

भांडुपच्या उषा को. आॅप. सोसायटीत आपल्या आईसह राहणारा राहुल सुब्रोतो राॅय या तरुणाने चांगल्या नोकरीसाठी आॅक्टोबर २०१७ मध्ये त्याचा बायोडेटा नोकरी डाॅट कॅाम साईटवर अपलोड केला होता. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये राहुलला दिल्लीच्या जाॅब सोल्युशन एजन्सीतून नंदिनी नावाच्या तरुणीने फोन केला. त्यावेळी तरुणीने नोकरी डाॅट काॅमवर राहुलचा बायोडेटा मिळाल्याचं सांगितलं.  

तिने तिच्या कंपनीतर्फे राहुलला इंडिगो एअरलाईन्स आणि जेट एअरवेज कंपनीत नोकरी देण्याचं आमीष दाखवून प्रोसेसिंग फी १८ हजार रुपये भरण्यास सांगितली. त्यानुसार राहुलने संबंधीत कंपनीच्या खात्यावर प्रोसेसिंग फी भरली. त्यानंतर कंपनीने २६ मार्च रोजी राहुलने दिलेली अाॅनलाइन परीक्षा पास झाल्याचं कळवलं. मग कागदपत्रे पडताळणीसाठी पुन्हा नंदिनीने ७ हजार ५००रुपये भरण्यास सांगितलं. 


ट्रेनिंगसाठी पैसे उकळले

२८ मार्च रोजी नेहा नावाच्या एका तरुणीचा पुन्हा राहुलला फोन आला. त्यावेळी तिने इंडिगो एअरलाईन्स कंपनीची मॅनेजर बोलत असल्याचं सांगितलं. तिने जाॅब सिक्युरिटी म्हणून पुन्हा १५ हजार रुपये भरण्यास सांगितले. ही रक्कम भरल्यानंतर राहुलच्या खात्यावर nehasingh@goindigo.in या नावाने मेल आला. त्यामध्ये राहुलच्या नावाने इंडिगो एअरलाईन्स कंपनीचं आॅफर लेटर होतं. २ एप्रिल २०१८ रोजी नंदिनीने फोन करून ट्रेनिंग सिक्युरिटी अनामत म्हणून २५ हजार ५०० रुपये भरण्यास सांगितले. 


पासवर्डसाठी पैशाची मागणी

त्यानंतर आॅफर लेटरला पासवर्ड देण्यात आल्याने ३ एप्रिल रोजी पुन्हा त्यासाठी ४५ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्याच दिवशी दुपारी पुन्हा नंदिनीने राहुलला फोन करून एम्पलाॅयमेंट आयडी व एअरपोर्ट टर्मिनल पाससाठी ३९ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर ५ एप्रिल रोजी ५५ हजार ५०० रुपये जाॅब सोल्युशनच्या नावाखाली भरण्यास सांगितले. अशा प्रकारे राहुलकडून तब्बल ४ लाख ९६ हजार ४१९ रुपये उकळले. एवढे पैसे भरल्यानंतर नोकरीवर रूजू होण्यासाठी राहुलने नंदिनीशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा फोन बंद येत होता. याबाबत राहुलने इंडिगो कंपनीकडे चौकशी केल्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचं कळालं.

माहिती चोरून फसवणूक

सायबर गुन्हे शाखेकडे दाखल हाेणाऱ्या गुन्ह्यात क्रेडिट कार्ड फसवणुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर सर्वाधिक फसवणुकीचे गुन्हे नाेकरीच्या अामिषाने हाेत असल्याचं अाढळून अालं अाहे. नाेकरी डाॅट काॅम, शाइन डाॅट काॅम या नाेकरीविषयक वेबसाइटवर गरजू तरुण आपली नोंदणी करतात.  राेजगाराच्या संधी असल्याचं त्यांना सांगितलं जातं. मात्र, फसवणूक करणारे भामटेदेखील अशी नोंदणी करून उमेदवारांची माहिती चोरतात. त्यानंतर उमेदवारास त्याच्या क्षेत्रानुसार नाेकरीची संधी उपलब्ध असल्याचे सांगत परदेशात किंवा नामांकीत कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक करतात.


गुन्ह्यात ७४ टक्के वाढ 

मागील सहा महिन्यात अशा प्रकारच्या १५१ गुन्ह्यांची नोंद झाली असून ४६ गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर मागील वर्षी जूनपर्यंत १०९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. यामधील फक्त २४ गुन्हे उघडकीस आले अाहेत.  त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत अशा प्रकारच्या फसवणूकीच्या गुन्ह्यात तब्बल ७४ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.  अशा प्रकारचे नोकरी संदर्भातील ईमेल आल्यास नागरिकांनी वस्तुस्थिती पडताळावी असं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे.



हेही वाचा -

विरार स्थानकात सापडले जीवंत काडतूस?

अबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा