पालघर हत्या प्रकरण: गौरव सिंह यांची उचलबांगडी, दत्तात्रय शिंदे नवे पोलीस अधीक्षक

दत्तात्रय शिंदे यांच्याकडे पालघर जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पालघर हत्या प्रकरण: गौरव सिंह यांची उचलबांगडी, दत्तात्रय शिंदे नवे पोलीस अधीक्षक
SHARES

पालघरमधील साधू हत्याकांडाच्या (palghar mob lynching) प्रकरणानंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंह (ips gaurav singh) यांची अखेर उलचलबांगडी करून त्यांच्या जागी दत्तात्रय शिंदे यांच्याकडे पालघर जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दत्तात्रय शिंदे (dattatray shinde new sp of palghar) सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत (mahavitran) मुंबई इथं कार्यकारी संचालक या पदावर कार्यरत आहेत. तिथून कार्यमुक्त होऊन तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे घेण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. शिंदे यांना सिंधुदुर्ग, सांगली आणि जळगाव येथील कामकाजाचा अनुभव आहे.  

सक्तीच्या रजेवर

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत गौरव सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पालघर जिल्ह्याची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात उपजिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली होती. 

हेही वाचा - पालघर हत्या प्रकरण: सीआयडीने केली आणखी १४ जणांना अटक

त्यानंतर गौरव सिंह सक्तीच्या रजेवर असतानाच त्यांच्याजागी दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती करण्याचा आदेश गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी शनिवारी काढला आहे. गौरव सिंह यांची अद्याप कुठेही बदली करण्यात आली नसून त्यांचं नाव प्रतीक्षा यादीत टाकण्यात आलं आहे.   

काय आहे प्रकरण?

पालघरमधील गडचिंचले गावात २ साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. १७ एप्रिल रोजी दाभाडी-खानवेल मार्गावरून हे तिघेही आपल्या कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला आणि त्यांना दगडाने ठेचून मारलं. हे प्रकरण चिघळल्यावर आरोपी जंगलात लपून बसले हाेते. पोलिसांनी जंगलात जाऊन तब्बल ११० जणांना अटक केली होती. यांत ९ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.

प्रकरण सीआयडीकडे 

ही घटना पोलिसांच्या डोळ्यादेखत झाल्याने विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका सुरू केली. शिवाय याप्रकरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणीही विरोधकांकडून करण्यात येत होती. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीच्या ताब्यात देण्यात आलं. याआधी कासा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंं होतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा