घरात पाणी सांडलं म्हणून सासऱ्याने सुनेच्या डोक्यात घातला हातोडा

मुलाला पाणी पाजताना जमिनीवर पाणी सांडल्याने सासऱ्याने सुनेच्या डोक्यात हातोडा घातल्याचा खळबळजनक प्रकार मालाडमध्ये समोर आला आहे.

घरात पाणी सांडलं म्हणून सासऱ्याने सुनेच्या डोक्यात घातला हातोडा
SHARES

मुलाला पाणी पाजताना जमिनीवर पाणी सांडल्याने सासऱ्याने सुनेच्या डोक्यात हातोडा घातल्याचा खळबळजनक प्रकार मुंबईच्या मालाड परिसरात समोर आला आहे. सुनेवर जीवघेणा हल्ला करून सासरा हेमचंद शर्मा (५५) फरार झाला आहे. या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात हेमचंद शर्मा विरोधात हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमकं प्रकरण काय?

मालाडच्या प्यारेलाल मिस्त्री चाळीत राहाणारी लक्ष्मी शर्मा (२२) ही महिला बुधवारी दुपारी आपल्या दीड वर्षांच्या मुलाला पाणी पाजत होती. त्याचवेळेस तिच्याकडून चुकून पाणी जमिनीवर सांडलं. मात्र या गोष्टीचा तिच्या सासऱ्यांना एवढा राग आला की त्यांनी लक्ष्मीला शिवीगाळ करण्यास सुरवात केली.


राग अनावर

शिवीगाळ करू नका असं लक्ष्मीने आपल्या सासऱ्यांना विनवताच हेमचंद यांना राग अनावर झाला आणि त्यांनी घराबाहेरील हातोडा आणून सुनेला मारहाण करण्यास सुरूवात केली. डोक्यात हातोड्याचे अनेक झेलल्यावर लक्ष्मी जागीच कोसळल्यानंतर हेमचंद यांनी तिथून पळ काढला. जाताना हेमचंदने घराचा दरवाजा बाहेरून बंद केला.


प्रकृती स्थिर

एव्हाना डोक्यातून वाहणाऱ्या रक्ताने आणि असह्य वेदनांनी लक्ष्मीने मदतीसाठी आराडा ओरड करण्यास सुरूवात केली. सुदैवाने शेजाऱ्यांनी लक्ष्मीचा आवाज ऐकला आणि ते तिच्या मदतीला धावले. त्यांनी मिळून तात्काळ लक्ष्मीला शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिची परिस्थिती स्थिर असल्याचं समजतं आहे.

या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७ अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मालाड पोलीस आरोपी हेमचंद शर्माचा शोध घेत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा