मृत्यूच्या तीन दिवसानंतरही 'ती' करत होती आईची सेवा


मृत्यूच्या तीन दिवसानंतरही 'ती' करत होती आईची सेवा
SHARES

आपल्या जवळची एखादी व्यक्ती दूर गेल्यास त्याचा मनावर आघात होतो. सर्वजण डोळ्यासमोर असताना देखील नसल्याप्रमाणे वाटत असतं. आणि मानसिक स्थिती खच्चून जाते. असाच काहीसा प्रकार कुर्ल्यातील एव्हरग्रीन को-आॅप. हाऊसिंग सोसायटीत पहायला मिळाला. मुलाने विभक्त चुल मांडल्यानंतर खचून गेलेल्या आईचा मृत्यू झाला. मानसिक तणावात असलेल्या मुलीने तीन दिवस आईच्या मृतदेहाशी गप्पा मारत तिची सेवा केली. मात्र त्या घरातून येणाऱ्या दुर्गंधीने स्थानिकांनी घराकडे लक्ष वेधत पोलिसांना या घटनेची कल्पना दिली.


काय आहे प्रकार?

कुर्ला पश्चिमेकडील एव्हरग्रीन को-आॅप. हाऊसिंग सोसायटीत मृत साबीर शेख (६५) आणि तिची मुलगी मुमताज या दोघी एकत्रित रहात होत्या. वडिलांच्या निधनानंतर काही वर्षांपूर्वीच उच्चशिक्षण घेतलेल्या भावाने लग्नकरून वेगळा संसार थाटला होता. या घटनेमुळे खचलेल्या साबीर आणि मुमताज यांनी समाजात लोक काय म्हणतील या भीतीने घराबाहेर पडणंच बंद केलं.
ऐवढंच नव्हे तर कुणाशी बोलायचं झाल्यास त्या दार न उघडता खिडकीतून संपर्क साधायच्या. पण त्या दोघींचा खर्च भाऊच भागवत होता. महिन्यातून अथवा आठवड्यातून एकदा तो दोघींची विचारपूस करण्यासाठी येत असे. त्याच वेळी त्यांचं दार उघडं दिसयाचं. तणावाने खचलेल्या साबीर या मागील अनेक दिवसांपासून आजारी होत्या. या आजारपणातूनच शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. मात्र आईला पुन्हा जाग येईल या आशेपोटी मुमताज आईच्या मृत्यूनंतरही तिची सेवा करत होती. त्यावेळी दाराबाहेरील अंगणात मुलं खेळाण्यासाठी आल्यास खिडकीतून त्या मुलांना टोकायची.


पोलिसांना दिली माहिती

दरम्यान आईच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी मुमताज यांचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी भाऊ येईपर्यंत दरवाजा उघडणार नाही. असे मुमाजने सांगितलं. या घटनेची माहिती स्थानिकांनी कुर्ला पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुमताजच्या भावाला बोलावून दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता साबीर शेख यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान विनोबा भावेनगर पोलिसांनी घटनेची नोंद करत मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरू केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा